संक्षिप्त
जोशी अकादमीतर्फे
आज संवादमाला
रत्नागिरी : येथील अरूअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे उद्या (ता. १७) सायंकाळी ५.३० वा. संवादमाला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अकादमीमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश गाठलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने संवादमाला या कार्यक्रमात रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक परीक्षार्थी, विद्यार्थी व पालक यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीतर्फे केले आहे.
--------------
उद्योग जगतातील
संधीवर मार्गदर्शन
पावसः श्रमिक किसान सेवा समिती संचालित रत्नागिरी लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिवारआंबेरे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वाणिज्य विभाग यांच्यावतीने उद्यामिता प्रोत्साहन अभियान यशस्वीरित्या पार पडले. रत्नागिरी जिल्हा स्वावलंबन केंद्राच्या स्वावलंबन भारत अभियानांतर्गत पेजे महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील नवीन संधी समजाव्यात यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोजगारयुक्त आणि गरिबीमुक्त आर्थिक स्वावलंबन तयार करणे, या प्रमुख उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले.
------
रत्नागिरी शिबिरामध्ये
२५ जणांचे रक्तदान
पावसः रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समिती संचालित रत्नागिरी लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान नाणिजधाम यांच्या सहकार्याने महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्रमिक किसान सेवा समिती संचालित रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत सामाजिक भान निर्माण व्हावे आणि त्यांच्यात सामाजिक गोडी निर्माण व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दिवशी रक्तदान करण्यासाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी आपले योगदान दिले. शिबिरामध्ये २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आणि नियोजनाचे डॉ. साईनाथ मालाप आणि डॉ. जयवल्लभ गंधेरे यांनी कौतुक केले.
---------
सूर्यकांत दळवींसोबत
गेलेल्यांची घरवापसी
दाभोळः काही दिवसांपूर्वी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिरसोलीचे रवींद्र जाधव, दहागावचे अयुब मसुरकर यांनी दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये घरवापसी केली आहे. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, महिला उपजिल्हा संघटिका मानसी विचारे, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, दापोली शहरप्रमुख संदीप चव्हाण, दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे, नगरसेवक आरिफ मेमन उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.