Konkan Business
Konkan Businessesakal

Konkan Business : सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं सोंग घेता येत नाही.!

सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं (Money) सोंग घेता येत नाही.
Summary

भांडवल हे उद्योगासाठी गरजेचेच आहे; पण ते किती प्रमाणात, कसे आणि कोणत्या स्रोतांतून घ्यायचे, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे.

-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com

कोणताही उद्योग (Business) साकारताना उद्योजकाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे सातत्याने भांडवल उभारणीचा. कारण, सगळी सोंगं घेता येतात; पण पैशाचं (Money) सोंग घेता येत नाही. आपली पत वापरून उद्योजकाला उद्योग उभारणीच्या विविध टप्प्यांवर आर्थिक मदत ही विविध मार्गांनी गोळा करावीच लागते व त्यातूनच पैशांची जुळवणूक होऊन खेळते भांडवल तयार होते. कधी कधी बाहेरून पैसा उभा करताना उद्योजकाची पुरती दमछाक होऊन जाते. सातत्याने करावी लागणारी पैशांची जुळवाजुळव यामुळे उद्योजक आपल्या उद्योगाला पुरेसा न्याय देऊ शकत नाही व त्याची नाहक चिडचिड होते.

उद्योग साकारताना या अशा गोष्टी नशिबी येणारच, हे समजून घेऊन यातूनही काही उद्योजक सुयोग्य नियोजन करून आपला भांडवल उभारणीचा प्रश्न मार्गी काढतात तर काही उद्योजक भांडवल उभारणीसाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब केला गेल्याने आणखीनच कर्जाच्या चिखलात रूतून जातात. भांडवल हे उद्योगासाठी गरजेचेच आहे; पण ते किती प्रमाणात, कसे आणि कोणत्या स्रोतांतून घ्यायचे, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे.

आपल्या गरजांची अचूक ओळख असलेले उद्योजक भांडवल उभारणीसाठी नाहक मनस्ताप करून घेत नाहीत तर ते आपल्या प्रकल्पाचा योग्य आराखडा बनवून शासकीय योजनांचा मोठ्या खुबीने वापर करून घेतात. काही उतावळे उद्योजक गरज नसताना निव्वळ दिखाव्यासाठी कर्जबाजारी होऊन बसतात. मुळात अगदी शून्यातूनही धंदा उभा करता येतो; पण त्यासाठी व्यवसायचक्र जलद स्वरूपाचे म्हणजेच काही तासांचे किंवा काही दिवसांचे हवे. सगळे स्वयंरोजगार याच प्रकारात येतात. त्यात एकल व्यक्ती मालक, चालक, व्यवस्थापक व कारागीर अशा भूमिकेत असल्यामुळे कामगारांच्या वेतन व भत्त्त्यांचा अतिरिक्त ताण तसेच गोदाम व्यवस्थापनाचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर येत नाही.

Konkan Business
Konkan Business : सतत कारणे देणाऱ्याचा उद्योग वाढत नसतो!

उद्योग सुरू करतानाच योग्य प्रकल्प आराखडा बनवला असल्यास लागणाऱ्या भांडवलाचा नेमका अंदाज घेता येतो व उद्योगाच्या सुरुवातीलाच तीन किंवा पाच वर्षांच्या प्रस्तावित व्यवसायवाढीतील मुद्द्यांची प्रामुख्याने नोंद घेता येते. भांडवल उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या योग्य पर्यायातून सुरक्षित व कमी जोखमीचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य उद्योजकाला असते. सर्व गोष्टींचा योग्य परामर्श घेऊन व अटकळ बांधून तसेच भविष्याचा वेध घेऊन उद्योजक आपल्या उद्योगविस्ताराचे स्वप्न लक्षात घेऊन तारतम्याने विचार करणारा असेल तर त्याच्याकडून नजर अंदाजानेही काही चूक होऊ शकत नाही.

उद्योग उभारणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रथम स्थिर मालमत्ता तयार करण्यासाठी भांडवल लागते. जसे की, जमीन, जमिनीचा विकास, इमारत खर्च, यंत्रसामग्री व इतर स्थिर मालमत्ता, फर्निचर, वाहने वगैरे वगैरे खेळते भांडवल हे उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचे असते. स्थिर भांडवलाव्यतिरिक्त होणारे इतर खर्च भागवण्यासाठी खेळत्या भांडवलाचे निर्धारण करणे गरजेचे असते. कच्च्या मालाची विक्री, आस्थापनेमधील साठवण क्षमता, आकर्षक वेष्टन साहित्यासाठी, कर्मचारी वेतन, भत्ते यासाठी व वीज, पाणी इंधन तसेच अन्य प्रशासकीय खर्च, विक्री, जाहिरात अशा खर्चासाठी फार मोठे खेळते भांडवल उपलब्ध करावे लागत असते.

Konkan Business
भारतातील 'ही' पहिली बुलेट ट्रेन वाऱ्याशी करणार स्पर्धा; बंदुकीतील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज!

उद्योजक किंवा प्रवर्तक स्वतःचे भागभांडवल घालून स्वतःचा उद्योग विकसित करू शकतो; पण जर उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय किंवा उद्योग असेल तर उद्योजकाला आपल्याकडील सर्व पुंजी किंवा गुंतवणूक प्राथमिक स्तरावरच पूर्णपणे गुंतवून टाकता येत नाही. कारण, उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय असल्यास रोजचे होणारे उत्पादन किंवा जर व्यवसाय सेवाक्षेत्रातील असेल तर ग्राहकांना रोज दिल्या जाणाऱ्या सेवा यातूनच उद्योजकाचा पैसा तयार होत असतो; पण पैसा जसा येतो तसा तो जाण्यासाठी वाटाही भरपूर असतात. हे पहिल्या पिढीतील उद्योजकांच्या नीटसे लक्षात येत नाही तसेच बचतीची व काटकसरीची सवय नसल्यास भांडवलीय तूट किंवा वित्तीय तूट यांचा उद्योजकाला सामना करावा लागतो.

आज-काल शासनाच्या विविध हितकारी योजना उद्योजकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य अभ्यास करून उद्योजक आपली आर्थिक बाजू कर्जाच्या स्वरूपात का होईना; पण तांत्रिकदृष्ट्या मजबूत करू शकतो. वेळेवर कर्जाचे हप्ते भरून आपली पत निर्माण करू शकतो. भांडवल उभारणीसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विचारवंत व क्रियाशील उद्योजकांनी करायलाच हव्यात अशा काही उपाययोजना : गरज नसताना खासगी कर्ज घेणे टाळावे तसेच स्त्रीधन तारण ठेवून कर्ज घेण्याचे टाळावे. अतिजोखमीचे घर गहाण ठेवून कर्ज घेणे टाळावे. भांडवल उभारणीसाठी शासकीय योजनांची आपल्या उद्योगाला काही मदत होऊ शकते का, हे पाहण्यासाठी जिल्हा उद्योगकेंद्राला भेट द्यावी. ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेमध्ये उद्योजकांसाठी खेळते भांडवलाच्या किंवा बीज भांडवलाबाबत काही योजना आहेत का, याचा प्राधान्याने अंदाज घ्यावा.

Konkan Business
10th-12th Exam : परीक्षेचा स्ट्रेस, टेन्शन, भीती कशाला?

व्यवसाय विस्ताराचे टप्पे सुरवातीलाच निश्चित करून घ्यावेत व त्यानुसार आराखडा तयार करून ठेवावा. कच्चा माल किंवा अर्धा कच्चा माल मुबलक प्रमाणात जिथे मिळत असेल तिथेच आपला उद्योग सुरू केला असता दळणवळणात थोडी बचत होऊ शकते. उत्पादित मालासाठी किंवा सेवाक्षेत्रासाठी बाजारपेठ जवळ आहे का, याची खात्री करून घ्यावी. आपल्या परिसरात असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आपण काही उद्योग करू शकतो का, याची चाचणी घेऊन व्यवसाय विस्ताराचे धोरण अवलंबावे. एकदम मनुष्यबळ वाढवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ वाढवावे. गरज असल्यास गुंतवणूकदार किंवा सक्षम भागीदार घेण्याचा विचार करावा म्हणजे भांडवल उभारण्याची जबाबदारी विभागली जाऊ शकते.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com