निसर्गाच्या संवर्धनासाठी आरक्षण द्या

निसर्गाच्या संवर्धनासाठी आरक्षण द्या
Published on

निसर्गाच्या संवर्धनासाठी आरक्षण द्या
पर्यावरणस्नेहींची मागणी; प्लास्टिकमुक्त शाळा अभियान राबवा

दापोलीत राज्यस्तरीय सहविचार सभा---लोगो

दाभोळ, ता. ३ : आज पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून निसर्गाला वाचविण्यासाठी राज्यातील पर्यावरणस्नेही एकत्र आले आहेत. त्यांनी आता निसर्गाच्या संवर्धनासाठी आरक्षणाची मागणी केली आणि त्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. दोन दिवस पर्यावरण संवर्धनासाठी काय काय करता येईल त्यावर चर्चा करून एकूण अहवाल तयार केला जाणार आहे.‌
टेलस ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी, महाएनजीओ आणि निवेदिता प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने जालगाव येथे पर्यावरण स्नेहींची सहविचार सभा आयोजित केली आहे. त्याचे उद्घाटन जालगाव येथे झाले. त्यावेळी सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. या वेळी टेलस संस्थेचे लोकेश बापट, महाराष्ट्र वृक्ष संवर्धनीच्या प्रिया भिडे, महाएनजीओचे शिंदे, निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे आदी उपस्थित होते. या वेळी पर्यावरणासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यात शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, बांधकाम व्यावसायिक मयूरेश शेठ, सरपंच जनार्दन आंबेकर, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी विनायक महाजन यांचा समावेश होता.
याप्रसंगी लोकेश बापट म्हणाले, राज्यात अनेक संस्था आहेत, जे पर्यावरणासाठी काम करतात. एकमेकांना माहिती नसते की कोण काय करते ? त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे म्हणून ही सभा आयोजित केली. प्रशांत परांजपे म्हणाले, आज पर्यावरणासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. पण शासन, प्रशासन कुठेच नाहीत. त्यामुळे सर्व संस्था एकत्र येत आहेत. त्यातून पर्यावरणासाठी काम करायचे आहे. आपल्या सर्वांच्या समस्यांचे एकत्रीकरण करून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. आज निसर्गासाठी आरक्षण मागणार आहोत.
या प्रसंगी प्लास्टिक मुक्त शाळा प्रस्तावाची मांडणी करण्यात आली. यावर परांजपे म्हणाले, सरकारने प्लास्टिक मुक्त शाळा करण्याचे धोरण आखले पाहिजे. विद्यार्थ्याने घरातील दर आठवड्यातील प्लास्टिक कचरा एक दिवस शाळेत जमा करायचा. कचरा साक्षरता करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांना जागरूक करायला हवे.

कोट
चिपळूण तालुक्यात आम्ही चार वर्षांपासून प्लास्टिक जमा करत आहोत. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील प्लास्टिक शाळेत आणून एकत्र करून ते रिसायकलला पाठवले जाते. आज पुस्तकांचे कव्हर देखील प्लास्टिकचे असते. ते पण बंद व्हायला हवे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील प्लास्टिक जमा करणे अपेक्षित आहे. पुस्तकाला प्लास्टिकचे कव्हर घालू नये याविषयी अध्यादेश येणे आवश्यक आहे.
- भाऊ काटदरे

कोकणात पर्यटन आणि रोजगार हवा असेल तर जल, वन आणि कृषी यावर लक्ष द्यायला हवे. गावातील भुजल पातळी योग्य ठेवायला हवी. इंडस्ट्रीमधील बॉयलरसाठी लाकूड वापरणे बंद करायला हवे. पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. हे थांबवायला हवे. नदीतील गाळ काढणे आवश्यक आहे. त्यामुळे पुराचा फटका गावांना फटका नाही. सार्वजनिक विहिरी, तलाव, हातपंप सुरू करावेत. तरच पाणीटंचाई दूर होईल.
- शहनवाज शाह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com