मोड जत्रेने कुणकेश्‍वर यात्रेची सांगता

मोड जत्रेने कुणकेश्‍वर यात्रेची सांगता

70297
कुणकेश्‍वर ः येथील किनाऱ्यावर समुद्रस्नानासाठी देवस्वाऱ्यांबरोबरच भाविकांची गर्दी झाली होती. (छायाचित्र ः वैभव केळकर)


मोड जत्रेने कुणकेश्‍वर यात्रेची सांगता

देवस्वाऱ्यांसह भाविकांचे समुद्रस्नान ः तीन दिवस भक्तिमय वातावरण

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः ठिकठिकाणच्या असंख्य शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानासह मोड जत्रेने आज सांगता झाली. विविध ठिकाणांहून आलेल्या देवस्वाऱ्या, त्यांच्यासोबतच्या मंडळींसह भाविक-भक्तांनी समुद्रस्नान केले. समुद्रस्नानानंतर भाविकांची दर्शनासाठी रांग होती. यात्रेची सांगता झाल्याने देवस्थान समितीसह सुरक्षा यंत्रणा काहीशी निवांत झाल्याचे दिसत होते. दरम्यान, तीन दिवस चाललेल्या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल झाली.
महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवारी (ता.८) ‘हरहर महादेव’च्या जयघोषात यात्रेला प्रारंभ झाला होता. महाशिवरात्रीला रात्री यात्रेत मोठी गर्दी झाली होती. काल (ता.९) सायंकाळच्या सुमारास अमावास्या सुरू झाल्यामुळे यात्रेत समुद्रस्नानासाठी गर्दी वाढू लागली होती. आज दुपारपर्यंत अमावास्या असल्याने काल रात्रीपासूनच समुद्रस्नानाला सुरुवात झाली होती. आज पहाटेपासून स्नानासाठी किनाऱ्यावर गर्दी उसळली होती. कुणकेश्‍वर भेटीसाठी जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या देवस्वाऱ्या आल्या होत्या. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असल्यामुळे यात्रेत मोठी गर्दी झाली होती. देवस्वाऱ्यांसोबत आलेल्या मंडळींनीही समुद्रस्नान केले. लहान मुलांबरोबरच महिला व ज्येष्ठांनीही समुद्रस्नानाचा आनंद लुटला. समुद्रस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात होती.
काल रात्रीपासूनच किनाऱ्यावर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती. समुद्रात खोलवर न जाण्याचा संदेश देण्यात येत होता. लहान मुलांना सांभाळण्याची सूचनाही केली जात होती. समुद्रस्नान करून देवस्वाऱ्या माघारी परतल्या. यात्रा कालावधीत विविध राजकीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्री देव कुणकेश्‍वरचे दर्शन घेतले. विविध ठिकाणच्या भजनी मंडळींची मंदिरात भजने झाली. आज समुद्रस्नान करून दर्शन घेण्यावर अनेकांचा भर होता. सायंकाळपर्यंत रस्त्यावर वर्दळ दिसत होती. यात्रेत हॉटेल व्यावसायिक तसेच खाजा, विविध खाद्यपदार्थ, शेतीजन्य विविध अवजारे, कलिंगड, कपडे, तयार कपडे, भांडी, शोभिवंत वस्तू, प्लास्टिक साहित्य, खेळणी यांची मोठी उलाढाल झाली. यात्रेत पंचायत समिती, महसूल विभागाचा कक्ष कार्यरत होता. यात्राकाळात रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ दिसत होती. खासगी, दुचाकी वाहनांची संख्याही मोठी होती. रात्री मंदिर परिसर, समुद्रकिनारा तसेच यात्रा परिसर गर्दीने फुलून गेला होता. समुद्रकिनारच्या भेळ, आईस्क्रिम तसेच विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. बच्चे कंपनीनी घोडेस्वारीबरोबरच उंटावरून फिरण्याचा आनंद घेतला. आज दुपारपर्यंत अनेकांनी समुद्रस्नानाचा आनंद लुटला.
...........
चौकट
देवस्वाऱ्या माघारी
पहाटेपासूनच समुद्रस्नानासाठी समुद्रकिनारी गर्दी झाली होती. कुणकेश्‍वर भेटीसाठी आलेल्या देवस्वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील वातावरण भक्तिमय बनले होते. समुद्रस्नानानंतर देवस्वाऱ्या माघारी परतल्या. यात्रेची सांगता झाल्याने सुरक्षा यंत्रणाही निवांत झाल्याचे दिसत होते.
.........
चौकट
आजही गर्दीची शक्यता
यात्रेची सांगता झाली असली तरीही उद्या (ता.११) सोमवार असल्याने भाविक कुणकेश्‍वरच्या दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. सलग सुट्यांमुळे पर्यटकांचीही कुणकेश्‍वरला उपस्थिती होती. त्यामुळे आज सायंकाळी उशिरापर्यंत परिसरात गर्दी राहण्याची शक्यता दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com