म्हापणमध्ये 9 ला गुढीपाडवा उत्सव

म्हापणमध्ये 9 ला गुढीपाडवा उत्सव

swt41.jpg
75224
श्री देवी शांतादुर्गा

म्हापणमध्ये ९ ला गुढीपाडवा उत्सव
तयारीला वेगः नववर्ष स्वागतासाठी सोहळ्याची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ४ः भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात मंगळवारी (ता. ९) गुढीपाडवा जत्रोत्सव धार्मिक व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. म्हापणमध्ये हिंदू नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात येते. या यात्रेला सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, कोल्हापूर व अन्य विविध भागांतून भाविक भक्त उपस्थिती लावतात. यानिमित्ताने श्री देवी शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टच्यावतीने गुढीपाडवा यात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे.
गुढीपाडवा उत्सवानिमित्त मंगळवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता जामदार खाण्यातून उत्सव मूर्ती काढण्यात येईल. सकाळी १० वाजल्यापासून देवीची ओटी भरणे, ११ वाजता पंचांग वाचन, दुपारी १२.३० वाजता दादरा नेणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता शांतादुर्गा मंदिराकडून श्री देवी माऊली पाट येथे खळा नेणे धार्मिक कार्यक्रम, ७.३० वाजता सर्वांना उत्सुकता असलेला पारंपरिक इंगळे न्हाणे व अन्य कार्यक्रम होतील. रात्री १२ वाजता श्रींची पालखी व प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
गुढीपाडवा यात्रेसाठी येणाऱ्या सर्व व्यावसायिक व व्यापारी यांनी आपल्या दुकानांच्या जागा निश्चितीसाठी ७ व ८ एप्रिल दरम्यान शांतादुर्गा मंदिराकडे येऊन जागा निश्चित करावी, असे आवाहन शांतादुर्गा, श्री देव खवणेश्वर, श्री सिद्धेश्वर व श्री ब्राह्मण देव देवालय ट्रस्ट (म्हापण) यांच्या वतीने करण्यात आले. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात सजावट, विद्युत रोषणाई आदी कामे सुरू आहेत. जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी कुडाळ, वेंगुर्ले, मालवण आगारांतून जादा बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी देवस्थान कमिटीने आगार प्रमुखांकडे केली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भाविकांसाठी एसटी बस सेवा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे पोलिस व होमगार्ड सुरक्षा यंत्रणेचा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एस.टी.ने वाहतूक नियंत्रणासाठी खास व्यवस्था उभारली आहे. दुपारनंतर जादा बस फेऱ्या म्हापण बाजारपेठेपर्यंत सुरू राहतील. पार्किंगची व्यवस्था केली आहे. विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली असून, भाविकांना योग्य तऱ्हेने दर्शन घेता यावे, यासाठी रांगांची व्यवस्था केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com