पान एक-बांबू ठरेल दगडी कोळशाला पर्याय

पान एक-बांबू ठरेल दगडी कोळशाला पर्याय

75330- पाशा पटेल

बांबू ठरेल दगडी कोळशाला पर्याय
पाशा पटेल ः कोकणात तग धरणारे पीक

शिवप्रसाद देसाई ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः ऊर्जा निर्मितीसाठी होणारे दगडी कोळशाचे ज्वलन''ग्लोबल वॉर्मिंग’च्या मुख्य कारणांपैकी एक मानले जाते. याला बायोमासमधील बांबू पर्याय ठरू शकतो. इंधनासाठी पृथ्वीच्या पोटातील नाही तर पाठीवरचे पर्याय शोधावे लागतील. त्यात बांबू महत्त्वाचा आहे. कोकणातील शेतकऱ्यांनाही पुढच्या काळात बांबू आर्थिक आधार देऊ शकेल, असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज ‘सकाळ’ला सांगितले.
श्री. पटेल सिंधुदुर्गात खासगी दौऱ्यावर आले होते. या दरम्यान ते म्हणाले, ‘‘पर्यावरणीय बदलांचा परिणाम वेगाने होत आहे. ही बाब थोपवणे एक राज्य किंवा देशाच्या हातात नाही; मात्र याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सगळेच प्रयत्न करु शकतो. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला दगडी कोळशाचे ज्वलन, पेट्रोल-डिझेलचा वापर, वृक्षतोड ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही दगडी कोळशाचा वापर गंभीर समस्या आहे. आता शासनाने ऊर्जा निर्मितीच्या इंधनात पाच टक्के बायोमास वापरण्याचे धोरण अवलंबले आहे; मात्र तितक्या प्रमाणात बायोमास उपलब्ध नाही. आम्ही वर्षभर केंद्र स्तरावर संघर्ष करून बायोमासच्या यादीत बांबूचा समावेश केला आहे. दगडी कोळशाच्या एक किलो ज्वलनातून दोन किलो ८०० ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. तुलनेत बांबू इकोफ्रेंडली आहे. दगडी कोळशाचा उष्मांक चार हजार आहे. बांबूचाही तितक्याच प्रमाणात आहे. दगडी कोळशाची राख ३३ टक्के तर बांबूची अवघी तीन टक्के आहे. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची मोठी क्षमता बांबूत आहे. यामुळे येत्या काळात बांबू दगडी कोळशाला पर्याय ठरणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. वातावरणातील बदलच्या परिणामांमुळे येथील आंबा, काजू, नारळ, सुपारी धोक्यात आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पडीक जमिनी आहेत. तेथे बांबू लागवड केल्यास बदलत्या वातावरणातही शेतकरी आर्थिकदृष्ट्या तरू शकणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘रोजगार हमीतून (एमआरजीएस) आता बांबूला हेक्टरी सात लाख रुपये अनुदान मिळते. यात सिंधुदुर्गाचाही समावेश आहे. याला जोडून विहीर व इतर घटक घेतल्यास अनुदान १७ लाखांपर्यंत जाऊ शकते. बांबू बहुगुणी आहे. त्यापासून कापडापासून फर्निचरपर्यंत बरेच काही करता येते. पर्यावरण संवर्धनासाठीही त्याचा फायदा होणार आहे. बदल ओळखून शेतकऱ्यांनी बांबूकडे वाट वळवली तर कोकणात खूप मोठे आर्थिक बदल होऊ शकतील.’’

पहिला तडाखा बसणार किनाऱ्याला
कार्बन उत्सर्जन वाढल्याने वातावरणात होणारे बदल भयंकर आहेत. येत्या काळात माणूस या पृथ्वीवर वाचेल का, हा प्रश्न आहे. बहुसंख्य पैसा असलेली शहरे जगात समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत. ग्लोबल वॉर्मिंगने समुद्राच्या पाणी पातळीत वाढू होऊन पहिल्यांदा ही शहरे नष्ट होणार आहेत. हा धोक्याचा इशारा समजून परिस्थिती बदलासाठी जगाने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत श्री. पटेल यांनी व्यक्त केले.

पृथ्वीच्या पोटातील नव्हे;
पाठीवरील ऊर्जास्त्रोत हवे
ऊर्जा निर्मितीसाठी पृथ्वीच्या पोटातून मिळणाऱ्या पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा घटकांचा वापर होतो; मात्र त्यांचे कार्बन उत्सर्जन खूप जास्त राहत आहे. याऐवजी पृथ्वीच्या पाठीवर निर्माण होणाऱ्या बांबूसारख्या पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर सुरू व्हायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com