नेत्यांचा राबता वाढला

नेत्यांचा राबता वाढला

१६ (निवडणूक पानासाठी)

चिपळुणात नेत्यांचा राबता वाढला

रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात विभागणी; कार्यकर्त्यांच्या भेटींवर भर

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : चिपळूण तालुका रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे. त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदार संघाच्यादृष्टीने या तालुक्याचे महत्व अधिक आहे. येथील नेत्यांचा स्थानिक मतदारांवर प्रभाव असल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार स्थानिक नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मतांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. त्यामुळे चिपळूणमधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
चिपळूण तालुक्यातील ७२ गावे गुहागर विधानसभा मतदार संघात म्हणजे रायगड लोकसभा मतदार संघात येतात. उर्वरित गावे चिपळूण विधानसभा म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येतात. चिपळूण तालुक्यामध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्ते जास्त आहेत, ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत. चिपळूणमधून मताधिक्य मिळवायचे असेल तर कोणा एका नेत्यावर अवलंबून राहून चालणार नाही, हे उमेदवारांना माहीत असल्यामुळे त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेत तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली; मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे चिपळूणचे दौरे वाढले आहेत. मागील आठ दिवसात ते तीनवेळा चिपळूणला आले. त्यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नीतेश राणे यांनीही एकदा चिपळूणचा दौरा केला. चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम महाविकास आघाडीमध्ये आहेत. त्यांनी शेकापच्या चिन्हावर रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. विनायक राऊत यांचा प्रचार करणाऱ्या रमेश कदम यांची काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर लगेच महाविकास आघाडीचे अनंत गीते रमेश कदम यांच्या भेटीला आले.
भास्कर जाधव यांची निर्णायक मते चिपळूण आणि गुहागरमध्ये आहेत. ते सध्या स्थानिक राजकारणापासून अलिप्त आहेत. चिपळूणमधील त्यांची उणीव भरून काढण्यासाठी विनायक राऊत यांनी माजी आमदार रमेश कदम यांना सोबत घेतले आहे. गुहागरमध्ये त्यांची गैरहजेरी कोणाच्या पथ्थ्यावर पडणार याची सर्वांना उत्सुकता आहे. किरण सामंत यांना महायुतीने उमेदवारी नाकारल्यानंतर चिपळूणमधील शिंदेगटाचे कार्यकर्ते नाराज होते. राणे यांच्या प्रचारफलकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो नसल्यामुळे त्या नाराजीमध्ये आणखी भर पडली होती; मात्र सदानंद चव्हाण नारायण राणे यांच्या प्रचारात सहभागी झाल्यामुळे ही नाराजी दूर झाल्याचे सांगितले जात आहे. चिपळूणमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांना मानणारे आहेत. ते चिपळूणसह गुहागर आणि खेडमध्ये तटकरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. या कार्यकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी तटकरे यांनी दादर कळकवणे येथील यात्रेला हजेरी लावली. चिपळूणमध्ये कोणत्या भागात कोणाचे नाव आहे, कोणाचा शब्द मानला जातो, अशा लोकांची यादी तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूचे उमेदवार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com