असाही खासदार!

असाही खासदार!

लोगो ः खासदारांच्या आठवणी
- सतीश पाटणकर
--
79744
किसनराव बाणखेले


असाही खासदार!
किसनराव अण्णा बाणखेले पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आंबेगाव तालुक्यातले. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार या पदांवर काम केलेले ते लोकनेते होते. शिक्षण जरी केवळ मॅट्रिकपर्यंत झालं असलं तरी गावाच्या मातीत झेललेल्या टप्या टोणप्यांनी व्यवहार ज्ञान अफाट होतं. त्यांची पहिली मुलगी जन्माला आली तेव्हा ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. त्या वर्षीच त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि साठच्या दशकात मंचरचा तरुण सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली.
------
डोक्यावर कडक टोपी, पांढरा शर्ट, धोतर, गळ्यात माळ आणि पायांत स्लिपर असा त्यांचा वेश. पहिल्यांदा कुणीही त्यांना बघितलं तर ‘कुठल्या गावचे पाटील वाट चुकून विधान भवनात शिरले’ असंच सगळ्यांना वाटायचं. त्यांच्यावर प्रेम करणारे लोक नेहमी अण्णांना सांगायचे की चप्पल किंवा बूट वापरा. त्याला आण्णा उत्तर द्यायचे, ‘‘हे स्लिपर चांगलं. कुठं हरवत नाही आणि कुठेही मिळतं.’’ विधानसभा आणि लोकसभेत ते स्लिपरच वापरायचे. यातूनच त्यांचं साधेपण कळतं. पण, एखाद्या गहन विषयावर चर्चा करण्यासाठी अण्णा उभे राहिले की त्यांची धडाडणारी तोफ पाहून अनेक आमदारांना धक्का बसायचा. त्यांच्या साधेपणाची अजून एक गोष्ट म्हणजे, मतदारसंघात फिरताना ते नेहमी सायकलवर फिरायचे. कुणी कार्यकर्ते भेटीला आले की आहे तिथे जागीच सायकल लावायचे आणि पुढचा प्रवास पायी करायचे. १९७२ ला जेव्हा अख्ख्या भारतभरात इंदिरा गांधींची लाट होती, तेव्हा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. घरची भाकरी खाऊन कार्यकर्ते प्रचाराला फिरत होते. पैशाचं कोणतंही पाठबळ नसताना किसनराव अण्णांनी
काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराला पराभूत केलं. एकदा खूप पाऊस पडत होता. खासदार बाणखेले पाबळ परिसरात होते. पावसात भिजत रस्त्याने निघालेले. पाठीमागून एसटी आली तेव्हा त्यांनी एसटीला हात केला. पण, चालक नवीन असल्याने त्यानं त्यांना ओळखलं नाही म्हणून एसटी थांबवली नाही. मात्र, एका प्रवाशाने खासदारांना पाहताच बेल ओढली. बेल वाजल्याचं लक्षात आल्यावर वाहकाने मागं बघून विचारलं, ‘‘कोणी बेल ओढली’’ तो प्रवासी म्हणाला ‘‘अहो, अण्णा गाडीला हात करत हुते.’’ वाहक म्हणाला ‘‘कोण अण्णा?’’ त्यावर प्रवासी म्हणाला ‘‘आपलं खासदार किसनराव बाणखेले.’’ हा संवाद चालू होता तोवर दार उघडून अण्णा आत आले. अगदी हसत हसत म्हणाले ‘‘आरं पोरानु, मला पावसात भिजत ठेवता का?’’ गाडी न थांबवल्याचा त्यांना किंचितही राग नव्हता. खासदार असताना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानीसुद्धा लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारी महाराष्ट्रातील ३५ मुलं राहत होती.
(लेखक मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com