नवी समीकरणे ठरविणारी लढत

नवी समीकरणे ठरविणारी लढत

79799
नारायण राणे

79800
विनायक राऊत


नवी समीकरणे ठरविणारी लढत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा ः कधी काळचे मित्रपक्ष आमने-सामने

अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदानसंघाची सुरु असलेली निवडणूक लढाई आगामी राजकिय समीकरणे नव्याने घडविणारी ठरणार आहे. कधीकाळी मित्रपक्ष किंवा एकाच पक्षात असलेले एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या निवडणूकीचा निकाल तळकोकणातील आगामी राजकारणाची दिशा ठरवणार आहे.
भाजपा श्रेष्ठीकडून अखेरच्या टप्प्यात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचे नाव महायुतीचे उमेदवार म्हणुन जाहीर केले. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गेली २५ वर्ष एकत्रित लढून विरोधकांना चितपट केलेले मित्र शिवसेना (ठाकरे गट) विरूध्द भाजपा आमने- सामने आले आहेत. ठाकरे व राणेंचे वैर सर्वश्रृत असल्याने या ठिकाणची ही लढत लक्षवेधी होणार आहे. अशातच राजकीय पटलावर भाजपा नेते राणे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते राऊत यांच्यात थेट लढत होत असल्यामुळे दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राणे मागील पराभवांचा वचपा काढणार कि गावा गावात पोहोचलेले राऊत विजयाची हॅट्टिक साधणार० हे पाहणे औसुक्याचे आहे. विशेष या लढतीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू भैय्या ऊर्फ किरण सामंत यांची महायुतीची भूमिका म्हणून राणे यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा हा मतदार संघ तब्बल ४४ वर्षानंतर भाजप कमळ निशाणी घेऊन लढणार आहे. मात्र, शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण मात्र या लोकसभेत महायुतीमुळे मतदारांना अनुभवता येणार नाही.
सद्यस्थितीत शिवसेना फुटीमूळे शिवसेना शिंदे गटाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केला होता. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु उद्योजक किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली होती. मात्र, उमेदवारी दाखल होण्याच्या पुर्वसंध्येला आपली ताकद राणे यांना निवडुन आणण्यासाठी खर्च करू असा विश्वास माध्यमांसमोर व्यक्त केल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन ४४ वर्षानंतर भाजपा ‘कमळ’ या चिन्हावर निवडणुक लढवित आहे.
श्री. राणे यांनी २००५ मध्ये त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसचा हात धरला. तिथपासुन ठाकरे व राणे यांच्यात टोकाचे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच २०१४ मध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंचा शिलेदार वैभव नाईक यांनी राणे यांना पराजित करून विधानसभेत एन्ट्री केली. तो पराभव राणे यांच्या जिव्हारी लागला. याबाबत त्यांनी वारंवार आपल्या सभांमध्ये पुर्नच्चार करत खंत व्यक्त केली. त्यानंतर वांद्रे- मुंबई येथील शिवसेना आमदार बाळ सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसकडून राणेंना पुन्हा रिंगणात उतरविण्यात आले. त्याठिकाणी सुध्दा त्यांना शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात २०१४ मध्ये (काँग्रेस) व २०१९ मध्ये (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) सलग दोन वेळा त्यांचे सुपूत्र निलेश राणे यांना शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या समोर पराभव पत्करावा लागला.
दिड वर्षापुर्वी शिवसेनेत उभी फुट पडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडून भाजपला साथ दिली. त्यानंतर शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा केल्याने निवडणुक आयोगाने पक्ष व चिन्ह शिंदे यांना देवून ठाकरे यांना मशाल चिन्ह दिले. आता मशाल या चिन्हावर लोकसभेची पहिलीच निवडणुक शिवसेना (ठाकरे गट) लढवित आहेत. एकुणच या बदललेल्या राजकीय स्थित्यतरात भाजप व शिवसेना ( ठाकरे गट) या दोन्ही पक्षाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत हि निवडणुक जिंकून मागील पराभवाचा वचपा काढायचा असा चंग राणेसह राणेंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनाशी बाळगला आहे. या मतदारसंघात सिंधुदुर्गात राणेंच नेटवर्क मजबूत आहे. त्यातच राणे भाजपावासी झाल्यामुळे केंद्र व राज्यातील सत्तेची ताकद, निवडणुकीत आवश्यक असलेले परिपुर्ण प्लॅनिंग भाजपकडे आहे. मात्र, रत्नागिरी भाजपला मतदार किती साथ देणार० हे महत्वाचे आहे.
रत्नागिरीमध्ये शिवसेना भक्कम असून शिवसेना फुटीनंतर उद्योगमंत्री सामंत शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत. सध्या ते भाजप सोबत महायुतीत असल्यामुळे राणेंना जमेची बाजु आहे. मात्र, या मतदारसंघात सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी सुध्दा उमेदवारीसाठी मोठी ताकद लावली होती. त्यांच्या ताकदीमुळेच राणेंची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब लागला, असे बोलले जात होते. आता आपण राणेंना ताकद देणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. रत्नागिरीमध्ये सामंत बंधुची ताकद व नेटवर्क भक्कम आहे. मात्र, ती ताकद व नेटवर्क राणेंच्या पाठीशी राहणार का० हा औत्सुक्याचा विषय आहे.
विनायक राऊत हे संपुर्ण मतदारसंघातील वाडी-वाडीवर पोहोचलेले व्यक्तीमत्व आहे. सर्व सामान्यमध्ये राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. शिवसेना फुटली तरी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी व आप सोबत आहेत. कुडाळचे आमदार नाईक, राजापूरचे आमदार राजन साळवींची भक्कम साथ आहे. दुसरीकडे राणे हे संपुर्ण मतदारसंघात वाडी-वाडीवर पोहोचले नसले तरी त्यांचा एक वेगळा राजकीय दबदबा असून सिंधुदुर्गात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची साथ आहे.
---
लढती ठरणार औत्सुक्याच्या
कणकवलीत तर राणे यांचेच सुपूत्र स्वतः आमदार असल्यामुळे गतवेळप्रमाणे यावेळीही अधिक मताधिक्य मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रत्नागिरीत उद्योगमंत्री सामंत भाजप सोबत युतीत आहेत. दुसरे चिपळूणचे आमदार शेखर निकम राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) असले तरी तेही भाजप महायुतीत असल्याने राणेंना मदत मिळू शकेल. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या विधानसभा मतदार संघ) १ हजार ९४२ मतदार केंद्रामध्ये मतदार कोणत्या उमेदवाराला साथ देणार? भाजपचे कमळ हाती घेणार की शिवसेना (ठाकरे गट) मशाल हाती धरणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com