''योग विद्या'' फाउंडेशनचा गरजवंतांना हात

''योग विद्या'' फाउंडेशनचा गरजवंतांना हात

swt2515.jpg
79833
वेताळ बांबर्डेः येथील नाग्या महादू कातकरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन संस्थेतर्फे साहित्य प्रदान करण्यात आले.

‘योग विद्या’ फाउंडेशनचा गरजवंतांना हात
दोन लाखांचे साहित्य वितरण; सावंतवाडी, कुडाळ तालुक्यांत उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २५ः मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे आणि रोणापाल येथील अनाथांच्या दोन वसतिगृहांसह सावंतवाडीतील आयुर्वेदिक कॉलेजला सुमारे २ लाख २० हजार रुपयांचे उपयोगी साहित्य प्रदान केले. समाजाचे आपण देणे लागतो, या सामाजिक जाणिवेतून व ‘मानव सेवा, हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून या समाजसेवी संस्थेने ही मदत केली आहे.
संस्थेच्या संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या महासमाधी मासानिमित्त या साहित्याचे गरजूंना वितरण करण्यात आले.
गेल्यावर्षीही असाच उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात या संस्थेने राबविला होता. समाजातील गरजवंतांचा शोध घेऊन ही मदत केली जात असल्यामुळे संस्थेची ही मदत खऱ्या अर्थाने सार्थकी लागणार आहे. मुंबई येथील ही सामाजिक संस्था आपल्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासत असताना कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गरजूंना मदत करत आहे. यापुढेही जिल्ह्यात गरजवंत समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
या संस्थेद्वारे ‘एम फॉर सेवा’ संस्थेच्या रोणापाल येथील दयासागर वसतिगृहास सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे धान्य, मसाले, तेल व इतर भोजन सामग्रीसह साबण, पेस्ट आदी साहित्य देण्यात आले. वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) येथील शोषित मुक्ती अभियान संस्था संचालित नाग्या महादू कातकरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना छत्री, शैक्षणिक व स्वच्छतेचे असे सुमारे ५० हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. सावंतवाडी येथील राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालयास मल्टिपॅरा मॉनिटर व सिरिन्जपंप असे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे रुग्णोपयोगी प्रदान करण्यात आले. यावेळी दयासागर वसतिगृहाचे जिवबा वीर, नाग्या महादू वसतिगृहाचे उदय आईर, राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे विश्वस्त डॉ मिलिंद खानोलकर, कार्यवाह बाळासाहेब बोर्डेकर, प्राचार्य डॉ. विकास कठाणे यांनी योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेचे आभार मानले.
यावेळी क्रियान्वयन फाउंडेशनच्या कार्यकर्त्या डॉ. मुग्धा ठाकरे, शोभा कविटकर, श्वेता धोंड, अँड्र्यू फर्नांडिस, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. संजय दळवी, डॉ. नंददीप चोडणकर, भार्गवराम शिरोडकर, करुणा गावडे, सुहास गावडे आदी उपस्थित होते.

चौकट
डॉ. प्रवीण ठाकरे यांचा पुढाकार
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे निःस्वार्थी भावनेने शहरासह ग्रामीण ते अतिदुर्गम भागात सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवितात. तसेच आपल्या परिचयाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमांचा लाभ ते गरजवंतांना मिळवून देतात. योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई ही संस्थाही डॉ. ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्यावर्षापासून जिल्ह्यात कार्यरत आहे. या संस्थेचे ध्येय पाहता संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजूंना मिळवून देण्याचा मनोदय डॉ. ठाकरे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com