कणकवलीत पुन्हा चोरी

कणकवलीत पुन्हा चोरी

पान एक

79876

कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ
सलग चौथी घटना ः १४ तोळे दागिने पळविले
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः शहरात आज पुन्हा चोरीची घटना उघड झाली. यात घराच्या बेड कप्प्यामध्ये ठेवलेले १४ तोळ्यांचे दागिने पळविले आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. तालुक्‍यात चार दिवसांतील चोरीची ही चौथी घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ः शहरातील परबवाडी येथील सावंत कुटुंबीयांनी घरातील बेडरूमच्या कप्प्यात चादर व इतर साहित्‍यासह १४ तोळे दागिने असलेली पिशवी ठेवली होती. बुधवारी (ता. २४) सावंत यांनी नव्याने खरेदी केलेला सोन्याचा दागिना बेडमधील कप्प्यात ठेवण्यासाठी बेडचा कप्पा उघडला असता, त्‍यात सोन्याचा ऐवज असलेली पिशवी आढळली नाही. त्‍यामुळे तेथे ठेवलेले सर्व दागिने चोरीला गेल्‍याची बाब लक्षात आली. १८ ते २४ एप्रिल या दरम्‍यान ही चोरी झाल्‍याची शक्‍यता सावंत कुटुंबीयांनी व्यक्‍त केली आहे. चोरीस गेलेल्‍या १४ तोळे सोन्यांच्या ऐवजामध्ये ८ तोळ्यांचे मंगळसूत्र, ४ तोळ्यांचा हार, १३ ग्रॅमची चैन, अडीच ग्रॅमची अंगठी, ४ ग्रॅमचे कानामधील कुंडी आणि एक नथ या दागिन्यांचा समावेश आहे. ही घटना लक्षात येताच सावंत यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली होती. मात्र, याबाबतची तक्रार त्‍यांनी दिलेली नाही.
तालुक्‍यात यापूर्वी २१ एप्रिलला शेर्पे-मुस्लिमवाडी येथे बंद घर फोडून चोरी झाली होती. मात्र, या चोरीतील दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्‍यानंतर २२ ला शहरातील विद्यानगर येथील डॉ. विकास एन. एम. यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३० हजारांची सोन्याची चैन आणि १५ हजारांची रोकड लंपास केली. तर २३ ला रात्री कलमठ-तरंदळे रोड येथील रूपेश जाधव यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी नवी दुचाकी लंपास केली आहे. त्‍यानंतर आज परबवाडी येथील १४ तोळे सोने चोरीची घटना उघडकीस आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com