एक सूर्यनमस्कार राष्ट्रासाठी, स्वास्थ्यासाठी!

एक सूर्यनमस्कार राष्ट्रासाठी, स्वास्थ्यासाठी!

80530
सावंतवाडी : येथे आयोजित ‘सूर्यनमस्कार’ उपक्रमात सहभागी युवक.

एक सूर्यनमस्कार राष्ट्रासाठी, स्वास्थ्यासाठी!

सावंतवाडीत उपक्रमास प्रतिसाद ः चारशे जणांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी जीवन धावपळीचे व तणावयुक्त झाले आहे. जीवघेण्या स्पर्धेचा सामना करताना माणसाला स्वतःच्या आरोग्याचाही विसर पडला आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, याचे भान माणूस विसरून गेलाय. निरोगी मनांच्या माणसांनीच समाज उन्नत होतो आणि समाजाच्या उन्नती बरोबरच त्या राष्ट्राचीही उन्नती होते, पण यासाठी समाजातील प्रत्येकाचे जीवन निरामय असणे आवश्यक आहे. निरामय जीवनासाठी नित्य व्यायामाची आवश्यकता असते, हीच जाणीव समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात जागृत व्हावी, या हेतूने सावंतवाडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या माध्यमातून राबविलेल्या ''एक सूर्यनमस्कार राष्ट्रासाठी'' या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सावंतवाडी येथील न्यायालयानजीक मारुती मंदिर व नरेंद्र डोंगर येथील मारुती मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ‘एक नमस्कार राष्ट्रासाठी’, ‘एक नमस्कार धर्मासाठी’, ‘एक नमस्कार स्वस्वास्थ्यासाठी’, अशी भावनिकतेची जोड देत सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला भाविकांचा विशेषतः तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ४०० जणांनी सूर्यनमस्कार घातले. हे सूर्यनमस्कार घातल्यानंतर यापुढेही रोज सातत्याने सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले.
--
उपक्रम ठरला सर्वांच्या चर्चेचा विषय
यावेळी उपस्थित संघाच्या स्वयंसेवकांनी आदर्श सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखवत सूर्यनमस्काराचे फायदेही उपस्थितांना समजावून सांगितले. त्याचबरोबर उपस्थित भाविकांची पादत्राणे ओळीत लावत स्वयंशिस्तीचे धडेही दिले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने बलोपासनेचे आवाहन करणारा उपक्रम म्हणून हा उपक्रम सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com