नवे शिक्षक त्वरीत नियुक्त करा

नवे शिक्षक त्वरीत नियुक्त करा

नवे शिक्षक त्वरीत नियुक्त करा

शाळा व्यवस्थापन ः बदल्यांसाठी भरती थांबविण्याच्या कृतीचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः आधीपासूनच सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नती व बदल्या या कारणासाठी नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवणे हे संयुक्तिक वाटत नसून हास्यास्पद आहे. आधीच जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांची कमतरता असताना असे निर्णय घेणे म्हणजे पालक व विद्यार्थी यांना दुर्लक्षित करण्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या रिक्त जागांवर तात्काळ नवीन शिक्षक नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी आता जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समित्या एकत्र आल्या आहेत. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे आपली भूमिका मांडली आहे.
शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्या शिक्षकांना नियुक्त्या देत असताना आधी बदली प्रक्रिया राबवा व मग नव्या शिक्षकांना नियुक्त्या द्या, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. त्यामुळे काही काळ थांबलेली बदली प्रक्रिया पुढे आचारसंहितेत अडकली. आता या विरोधात शाळा व्यवस्थापन समित्यांनी भूमिका घेतली आहे. वेताळ बांबर्डे येथील जयसिंग धुरी यांच्यासह वेताळ बांबार्डे, निवजे, कर्याद नारुर, गिरगाव, रांगणा तुळसुली येथील
शाळा व्यवस्थापन समितीच्या ५० च्या वरती सदस्य व पालकांनी निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे. यातील आशय असा, पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये होऊ घातलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या ८ मार्चला नियुक्तीपत्रके देऊन तासाभरातच जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत प्रशासकीय कारणास्तव म्हणजेच कार्यरत शिक्षक संघटनांच्या दबावाखाली रद्द करण्यात आल्याचे समजते. यामुळे आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे शिक्षकांअभावी आधीपासूनच होत असलेल्या शैक्षणिक नुकसानात आणखी दोन महिन्याची भर पडली. आधीपासूनच सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नती व बदल्या या कारणासाठी नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवणे हे संयुक्तिक वाटत नसून हास्यास्पद आहे. आधीच जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांची कमतरता असताना असे निर्णय घेणे म्हणजे पालक व विद्यार्थी यांना दुर्लक्षित करण्यासारखे आहे. त्यामुळे या पत्राद्वारे आम्ही पालक आपणास कळवू इच्छितो की, आता होत असलेली हि शिक्षक भरती शिक्षक संघटनांच्या दबावामुळे अशीच लांबल्यास पालक म्हणून आम्ही या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुले ठेवायची कि नाही या संभ्रमात आहोत. १५ मे २०२४ पर्यंत जर जिल्ह्यातील शाळांना शिक्षक मिळाले नाहीत तर आम्ही पालकवर्ग, जिल्हा प्रशासन व शिक्षक संघटना यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहोत आणि हे आंदोलन करावे लागल्यास याला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व प्राथमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग पूर्णपणे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
------------
चौकट
पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न
पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. २०१७ भरतीमधील २९ नोव्हेंबर २०२३ ला प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थागनादेश उठविणेच्या दृष्टीने सिविल अॅप्लीकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
---------
चौकट
रखडलेली नियुक्ती सुरू करण्याचे निर्देश
२५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यता धारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश दिले आहेत.
--
सावध रहाण्याचे आवाहन
या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहिती नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यापासून सावध राहावे, ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील, त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com