विनाशकारी प्रकल्प रोखणे गरजेचे

विनाशकारी प्रकल्प रोखणे गरजेचे

80818
सावंतवाडी ः येथे शाश्वत कोकण परिषद कार्यक्रमात बोलताना कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे.

विनाशकारी प्रकल्प रोखणे गरजेचे

प्रसाद गावडे ः कोकणातील युवकांनी पुढे यावे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः आपल्या जीवनशैलीतून आपल्याला कोकण जपता आले पाहिजे. आपल्या कोकणात येणारे विनाशकारी प्रकल्प रोखण्यासाठी कोकणातील युवकांनी एकत्र यायला हवे. कोकणाला बुद्धिमत्तेचा, विचारांचा वारसा लाभला आहे . कोकणातल्या युवकांची बुद्धिमत्ताही प्रचंड आहे. परंतु, आजचा युवक जेव्हा राजकारण्यांच्या मागे धावत आपला वेळ वाया घालवताना दिसतो तेव्हा वाईट वाटते, असे प्रतिपादन कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी येथे केले.
‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ ही टॅगलाईन वापरून शाश्वत कोकण परिषदेचे येथील आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये आयोजन केले होते. या परिषदेत बारसु आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेले पर्यावरण अभ्यासक सत्यजित चव्हाण तसेच मल्हार इंदुलकर, मंगेश चव्हाण, शशी सोनावणे यांनी देखील आपले मत व्यक्त केले. श्री. गावडे पुढे म्हणाले, ‘‘कोकण हे जगातील आजच्या घडीचं जगण्यासाठी अतिशय चांगले ठिकाण आहे. केवळ आजी-आजोबांचे कोकण आपल्याला ठेवायचं नाही. शेवटची पिढी ही सहानुभूती घेऊन कोकण वाचवायचं नाही. जी तरुण पिढी आता आहे, तीच नवी पिढी आहे. शेवटच्या पिढीतील जीवनशैली आपल्याला स्वतःत उतरविली तरच शाश्वततेकडे जाऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने होत असलेला विकास डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे. आपण वेडे, स्वार्थी बनू नये. आपण फक्त माझा मी शाश्वत जगतो या मानसिकतेत राहता कामा नये. आपल्या आजूबाजूचे कोकण जोपर्यंत उद्‍ध्वस्त होत आहे, तोपर्यंत आपण शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या आजूबाजूच्या देवराई जपल्या गेल्या पाहिजेत. कोकणामध्ये येणारे जे विनाशकारी प्रकल्प असतील ते थांबवण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. म्हणूनच कोकणची लोक संस्कृती, जीवनशैली बाबत जनजागृती करणारे कार्यक्रम भविष्यात या माध्यमातून राबवले जातील.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘काय नाकारायचे, काय स्वीकारायचे आणि काय जतन करायचे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी महत्त्वाच्या आहेत. त्या राबविण्याची प्रकिया म्हणजे शाश्वत कोकण परिषद असं मला वाटतं. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट क्रायसिस हे मानवनिर्मित आहेत, त्यापेक्षा भांडवली व्यवस्थेने दिलेले आहेत. हे ज्यांना समजतंय ते जाणीवपूर्वक नाकारतायत. त्या लढ्याचा आपण सर्वजण भाग आहोत. हा झाला नाकारण्याचा भाग. कोकणातले सर्वच जिल्हे घ्या, यात पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत अख्खा पट्टा मुंबईसह पकडला तर सागरी, डोंगरी आणि नागरी असे क्षेत्र. यामध्ये आपण सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहोत, हे आपल्याला जेवढे जाणवतं तेवढं पॉलिसी मेकर्सना जाणवत नाही. किंबहुना त्यांच्या दृष्टीने हे सर्व रिसोर्सेस आहेत. त्यांनी माणसाचा सुद्धा रिसोर्स करून टाकलाय. त्याला तुम्ही हद्दपार केलंच पाहिजे. ‘विकासाची दृष्टी उफराटी’ हे आपण मान्य केलं पाहिजे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत ‘विकास वेडा झाला’ अशी घोषणा देण्यात आली होती. त्याप्रमाणे आता खरोखरच विकास वेडा झालाय हे आपण स्वीकारलं पाहिजे. हा वेडेपणा मान्य केला तर त्यावर उपाय करून त्याला मार्गावर आणता येते. मात्र, माझी लाईन बरोबरच आहे, मी सरळमार्गी असं म्हटलं तर त्याचे उत्तर शोधता येत नाही.’’
पर्यावरण अभ्यासक सोनावणे म्हणाले, ‘‘आपल्याकडे बरंच काही आहे. पण, आपल्याला ते समजलं नाही, ही आपली समस्या आहे. आंदोलनातून आपण आतापर्यंत खूप गाऱ्हाणी मांडली. आता गाऱ्हाणं नको. विनाशकारी प्रकल्प येऊच देणार नाही. आमच्या भागात बनूच देणार नाही या भूमिकेत आपल्याला राहावं लागेल. आमच्या विकासाच्या वाटा आम्ही चालू. आणि जेव्हा लोक मिळून हे ठरवतात, तेव्हा सर्वांगीण गोष्टी घडून येतात. त्याचा दबाव पॉलिसी मेकर्सवर पडतो. पॉलिसी मेकर्स हे आपल्यातलेच असले पाहिजेत. नियोजन ठरवणारे, धोरण ठरवणारे हे हात आपल्यातलेच असले पाहिजेत असा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. आता कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. जो-जो विनाशकारी प्रकल्प, विनाशनीती, या निसर्गाची हानी करणारे आपल्यावर लादले जातील, त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल. कायद्याची लढाई कायदेशीरपणे लढावीच लागेल याला पर्याय नाही आणि लढत असताना मग जे मुळात आमचं आहेच त्याचं जतन, संवर्धन आणि विकास हे समांतरपणे आपल्याला करावे लागेल. त्यामुळे झेंडा घेऊन आंदोलन करणारा कार्यकर्ताही हवा आणि शांतपणे अदृश्य राहून काम करणारे मोठा समूहही जोडीला हवा.’’
------------
चौकट
विकासाची धोरणं उद्ध्वस्त करणारी
आतापर्यंत राबवण्यात आलेली विकासाची धोरणं ती सर्वच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारी आहेत. स्थानिक निसर्गाला उद्ध्वस्त करणारी आहेत. मुंबई गोवा महामार्ग झाला, चिंता वाढली. कोकण रेल्वे आली, चिंता वाढली. गैरसोय परवडली; पण ही सोय नको, असं म्हणायची वेळ आली. अशावेळी व्यापक दृष्टिकोन ठेवून समृद्धीचा विचार करावा लागेल, असे पर्यावरण अभ्यासक सोनावणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com