तिथवलीत पोलीसाला बेदम मारहाण

तिथवलीत पोलीसाला बेदम मारहाण

पान एक

तिथवलीत पोलिसाला बेदम मारहाण
चौघांवर गुन्हा ः चौकशीसाठी गेले असता प्रकार
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः जातिवाचक शिवीगाळ करीत पोलिस कर्मचारी शैलेंद्र कांबळे यांना बेदम मारहाणीचा धक्कादायक प्रकार तिथवली येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (ता. २९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिथवली येथील नानीवडे फाटा येथे झाला.
पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणि आचारसंहिता प्रतिबंधात्मक कायद्यानुसार तिथवली येथील संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम रामचंद्र हरयाण, प्रकाश हरयाण आणि दिलीप हरयाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
तिथवली येथील एका दुकानात बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांना फोनद्वारे मिळाली होती. याची खातरजमा करून कारवाई करण्याची सूचना त्यांनी पोलिस हवालदार कांबळे आणि पोलिस शिपाई जितेंद्र कोलते यांना केली. ते दोघे पोलिस गाडी घेऊन तिथवलीला गेले. तेथे पोहोचल्यानंतर तिथवली येथील संतोष हरयाण हे तेथे आले. त्यांनी शैलेंद्र कांबळे यांना ‘तू इथे का आलास’ अशी विचारणा करीत त्यांच्याशी हुज्जत घातली. श्री. कांबळे यांनी वरिष्ठांनी चौकशीसाठी पाठविले असल्याचे सांगितले. परंतु, संतोष हरयाण, आत्माराम हरयाण, प्रकाश हरयाण, दिलीप हरयाण या चौघांनी श्री. कांबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करीत रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक अवसरमोल, पोलिस निरीक्षक रोहित खोत हे घटनास्थळी पोहोचले. तेथून त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस स्थानकात आणले. श्री. कांबळे यांनी जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या चौघांपैकी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव करीत आहेत.


वरिष्ठ अधिकारी
वैभववाडीत दाखल
पोलिस कर्मचाऱ्याला मारहाणीने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली. या प्रकाराची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. आज अप्पर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावळे, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव हे वैभववाडीत दाखल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com