''फेणी'' शौकीनांची पंचाईत

''फेणी'' शौकीनांची पंचाईत

‘फेणी’ शौकीनांची पंचाईत
गोव्यातील दारु विक्री बंदः निवडणूकीमुळे रविवारपासून निर्बंध
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ः लोकसभा निवडणुकीच्या ७ मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ५) सायंकाळी ६ पासून ७ मेच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. या कालावधीत महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातील सर्व मद्यालये, दारू विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने गोवा फेणीचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्गसह गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास, मिरवणूक, फेरी आयोजित करण्यास किंवा बैठका आयोजित करण्यावर बंदी घातली आहे. निवडणुकीत पैसे वाटपाच्या शक्यतेने याकाळात दोन्ही राज्यांचा सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले असून येणाऱ्या-जाणाऱ्या खासगी वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. गोवा राज्यातील सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने रविवारपासून सायंकाळी ६ वाजल्यापासून ते मतदानादिवशी ७ मे पर्यंत बंद राहतील.
गोवा राज्य हे पर्यटनाबरोबरच गोवा फेणीसाठी प्रसिद्ध आहे. राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने या फेणीचा आस्वाद घेतात. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गैरप्रकार टाळण्यासाठी दारू विक्रीवर बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. महाराष्ट्र-गोवा सीमेवर सर्वाधिक मद्याची विक्री होते. मात्र, दारू बंदीची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याने सीमाभागातील तळीरामांची देखील पंचाईत झाली आहे.

चौकट
गोवा सीमेवर कडक बंदोबस्त
दारू विक्री तीन दिवस बंद असल्याने तसेच निवडणुकीच्या काळात दारूला मोठी मागणी असल्याने गोवा बनावटीच्या दारूची सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र राज्यात बेकायदा तस्करी होण्याचे प्रकार वाढणार आहेत. यामुळे पोलीस तसेच अबकारी खात्याचे या काळात महाराष्ट्र गोवा राज्यांचा सीमेवर विशेष लक्ष असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com