वरमाय निंगाली रस्त्याला
वरमाय निंगाली रस्त्याला Sakal

वरमाय निंगाली रस्त्याला ....

नाटे, भाट्ये, कर्ला, गावखडी, पूर्णगड, शिरगाव, साखरतर अशा अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला नाहीतर घरच्या अंगणात मासळी सुकवतानाही त्या भेटतात.

या साऱ्या मत्स्यगंधेच्या लेकी मला नेहमी भेटतात. त्या बोटी बंदरात लागल्या आणि त्यांच्यावरची मासळी बंदरात उतरवली की, त्यांची वर्गवारी करत, किंमत ठरवत, लिलाव करताना किंवा लिलावात विकत घेताना, मच्छी बाजारात जाण्याची घाई करताना नाहीतर आपापली जागा पकडून मासळी बाजारात मासळी विकताना!

नाटे, भाट्ये, कर्ला, गावखडी, पूर्णगड, शिरगाव, साखरतर अशा अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला नाहीतर घरच्या अंगणात मासळी सुकवतानाही त्या भेटतात. तेव्हा त्या पूर्णपणे त्या आपल्या व्यवसायात समरस झालेल्या असतात; पण याच कोळीणी जेव्हा घरच्या किंवा गावातल्या एखाद्या लग्नात नाहीतर कुठल्यातरी समारंभात भेटतात तेव्हा त्या अगदी वेगळ्या दिसतात आणि जाणवतातही! आपली मच्छिवालीची भूमिका तेव्हा त्या बंदरात नाहीतर मासळी बाजारात आपल्या टोपल्यांमधून दडवून ठेवत असाव्यात बहुतेक!

- डॉ. स्वप्नजा मोहिते,रत्नागिरी

एखाद्या लग्नात नाहीतर कुठल्यातरी समारंभात कोळणी नटतात, सजतात अगदी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन साग्रसंगीत मेकअपही करून येतात आणि पारंपरिकतेला चढवतात सुंदर साज आधुनिकतेचा! त्यात ती वरमाय असेल तर विचारूच नका!

तीच चापूनचोपून नेसलेली बारावार साडी नव्हे सारा; पण तिला आता जरतारी लखलखता काठपदर असतो. तोच दंडापर्यंत येणारा ब्लाऊज; पण आता तो जरीकाठाचा, मोत्यांनी सजलेल्या नक्षीकामाचा असतो. पाटल्या, चुडा, तोडे, लकपक हार, गाठलं, डोरलं अन कंठी, कानातल्या कुड्या नाहीतर काप, मोत्याची भलीथोरली नथ .... अगदी सगळे दागदागिने तेव्हा अंगाखांद्यावर मिरवत त्या वावरत असतात अगदी सहजपणे.

डोक्यावरच्या अंबाड्यात सोन्याचे आकडे, सुवर्णफूल, अग्रफूल यांच्याबरोबरच पारंपरिक वेणी म्हणजे चांदवन तर पाहिजेच! अबोलीची किंवा कोळीभाषेत ज्याला इंग्लिश पाला म्हणतात त्याची वेणी म्हणजे चांदवन हा तिचा खास मान! अगदी डोक्यावरच्या अंबाड्यापासून पावलापर्यंत अगदी नखशिखांत अशी ही वरमाय नटते, ती तिच्या लेकाच्या लग्नात! एवढं असूनही कुठेही कोणाचा हेवा नाही की, मत्सर नाही. दुसरीच्या साडीचं नाहीतर डोरल्याचं मनापासून कौतुक तिनंच करावं!


वरमायीचा थाट तर शब्दांच्या पलीकडलाच असतो! घरावर लावलेल्या लाऊडस्पीकरवर गाणं वाजत असतं ... वरमाय निंगाली रस्त्याला .. लोग जमलेव तुला बगावला ... माजी लारकी भयनीला वाजितगाजित आनलाय घरा!

वरमाय म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी. नवरदेवाला हळद लावून झाली की, वरमाईला माहेरी वाजतगाजत आणलं जात. तिचे भाऊ तिला अगदी हाताला धरून माहेरी आणतात. तिच्या डोक्यावर भरजरी छतीर म्हणजे सजवलेली छत्री खुद्द भाऊ धरतो या वेळी.

ती लक्ष्मी... तिला सन्मानाने घरी आणायलाच हवंनं! वरमायला माहेरी आणणे याला व्हारनीला आणणे, असे म्हटले जाते. तिचे पाय दुधाने धुतले जातात आणि तिची दृष्टीही काढली जाते. हो! या वरमाईला कोणाची दृष्ट नको लागायला!

मागल्या अंगणात रांगोळीने कणा काढून त्यावर पाटावर बसवून वरमाईला घरातल्या स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणत, अगदी अंघोळही घालतात आणि मग तिलाही लावली जाते हळद. भावजयीनं चढती हळद लावायची असते या वेळी. म्हणजे पायापासून वर डोक्यापर्यंत अशी हळद लावली जाते. तिला पिवळी किंवा शेंदरी रंगाची भरजरी साडीचोळी देऊन भावजयी तिची ओटी भरतात.

तिला नटवलं आणि सजवलं जातं. अशा अगदी लक्ष्मीरूपात सजवलेल्या वरमायीला मग सजवलेल्या खुर्चीवर बसवलं जातं. मग एक खास पोखाऊचा विधी तिची भावजय करते. यात मुठीत तांदूळ घेऊन वरमायीच्या पायापासून वर डोक्यापर्यंत त्यांनी स्पर्श करत हे तांदूळ तिच्यामागे फेकले जातात.

शरीरातील सप्तचक्रांच्या स्थानांना स्पर्श करत शरीरातील ऊर्जा जागवत ती दैवीऊर्जा वरमायीच्या अंगी जागी व्हावी यासाठी हा विधी! सगळंच किती भारावून टाकणारं आणि विचारही करायला लावणारं!


अगदी लक्ष्मीसारखी सजलेली ही वरमाय जेव्हा भावांचा हात धरून त्या भरजरी छत्रीखालून गावातून फिरते तेव्हा अख्ख गाव तिच्या पाया पडत असतं आणि आपल्याला नेहमी भेटलेली पारूमावशी नाहीतर मंगलाकाकी हीच का, असा मला प्रश्न पडत राहतो. साक्षात लक्ष्मी तेव्हा घरात आल्याने तिच्या माहेरी तर वेगळाच माहोल असतो.

अशी नखशिखांत सजलेली वरमाय जेव्हा माहेरचा उंबरठा, मांडवात जाण्यासाठी ओलांडते तेव्हा तिच्यासमोर सुपात तांदूळ ठेवले जातात. पाऊल बाहेर ठेवताना ती हे ओंजळभर तांदूळ मागे उडवते आणि मागे उभ्या असलेल्या स्त्रिया ते आपल्या पदरात झेलतात.

लक्ष्मी या रूपात भरभराटीचा आशीर्वाद देत जाते, असा विश्वास हा सोहळा देत राहतो. यानंतरचा महत्वाचा विधी म्हणजे वरमायीला एक मोतीकाम केलेला जरतारी, मिररवर्क केलेला पट्ट्यासारखा शेला खांद्यावर दिला जातो

अशी सजलेली नटलेली वरमाय माहेराहून मिरवत मंडपात गेल्याशिवाय नवरदेव मांडवात येऊ शकत नाही. तिच्या चेहऱ्यावर तेव्हा वेगळच तेज असतं आणि तिच्यासमोर चालणारे बँडवाले वाजवत असतात .... बाजेवाले लागेलन जोरान वाजवायला.. लोग लागलेन तुला बगावला .... वर माय निंगाली रस्त्याला ..!! वरमाय मांडवात जायला माहेरून निघाली की, या लक्ष्मीची इतर कोळी स्त्रिया आपल्या पदराच्या पायघड्या घालतात तिच्यासमोर.

या वेळी कोळीवाड्यातलं वातावरण भावूक आणि भारलेलं होऊन जातं. आनंदाला उधाण येतं आणि बॅण्डबाजाचा सूर आणखीनच वाढतो. वरमाईचे बंधू तिचे हात पकडून तिला गावातून मिरवत मांडवाकडे घेऊन जात असतात आणि एक वेगळीच संस्कृती आपल्यासमोर तेव्हा उभी राहते. रोजचं मच्छीचं पाणी नाही, त्या गच्चं भरलेल्या टोपल्या, ती मासळी बाजारात न्यायची गडबड आणि तो रोजचा गोंधळ यांचा मागमूसही तिथे दिसत नाही तेव्हा!


मांडवाकडे येण्याअगोदर वरमाय आणि तिच्याबरोबरची वरात आधी येते गावच्या देवळात. ग्रामदेवतेबरोबरच सासरच्या आणि माहेरच्याही कुलदैवताला साकडं घातलं जात, आवाहन केलं जातं. वरमाईला खंडोबाचा भंडारा लावला जातो आणि आता ती मांडवाकडे जायला सज्ज होते.

तिचे लाडके बंधू तिच्यावरून नोटांची उधळण करत असतात आणि ही मत्स्यगंधेची लेक लक्ष्मीच्या रूपात सगळ्यांना आशीर्वाद देत असते. लक्ष्मी ...सागराची कन्या ....सागरातून उत्पन्न झालेली ... म्हणूनच कोळी समाजात यांच्या लेकी सुनांना लक्ष्मी मानण्याची प्रथा असावी. त्या पिवळ्या शेंदरी सारीमध्ये मूर्तिमंत नटलेली ही वरमाय तेव्हा खरंच लक्ष्मीच वाटत राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com