सहकारमहर्षी 
शिवरामभाऊ जाधव

सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव

लोगो ः कोकण आयकॉन
------
83130
शिवरामभाऊ जाधव
83131
सतीश पाटणकर


सहकारमहर्षी
शिवरामभाऊ जाधव


लीड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार वाढीसाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अनन्यसाधारण असे योगदान दिले, त्या यादीत शिवरामभाऊ जाधव हे नाव सर्वांत अग्रस्थानी असेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत सहकार वाढीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. जीवघेणी मेहनत केली. शहरी भागापासून ते डोंगरदऱ्या-गिरिकंदरापर्यंत, असेल तर वाहन नाहीतर पायी प्रवास केला. एखाद्या झपाटलेल्या वैद्यात्रिकाप्रमाणे सहकार क्षेत्रात झोकून देऊन अपार कष्ट केले. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीवर परिश्रमपूर्वक मात करणे व निर्धारपूर्वक आपले काम करीत राहणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.
- सतीश पाटणकर
..............
शिवरामभाऊ जाधव यांचा जन्म १ जून १९३६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या परेल येथील आर. एम. भट हायस्कूलमध्ये झाले. आर. एम. भट हायस्कूलचे मुख्याध्यापक तत्कालीन समाजवादी नेते, मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आचार्य मो. वा. दोंदे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे शिवरामभाऊंच्या विचारांवर समाजवादी विचारांचा प्रभावही पडला होता; पण ते समाजवादी पक्षात कधी सक्रिय झाले नाहीत. भूदान यात्रेनंतर शिवरामभाऊ यांनी तत्कालीन रत्नागिरी जिल्हा हे आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. राजकारणापेक्षा सहकार आणि शेती या क्षेत्राची त्यांनी निवड केली. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीतील शेतकऱ्यांना संघटित करून त्या जमिनी कसणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभे केले. माणगाव खोरे हे भाताचे कोठार म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध होते. आकारीपड जमिनी कसवटदारांच्या नावे कराव्यात, या मागणीसाठी त्यावेळी माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीतील शेतकऱ्यांच्या सावंतवाडीच्या प्रांत कचेरीवर या मंडळींनी काढलेला अभूतपूर्व आणि अविस्मरणीय मोर्चा सिंधुदुर्गवासीयांच्या दीर्घकाळ लक्षात राहिला. शासनाने ही शिफारस स्वीकारून या जमिनी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेऊन जमीन वाटपाची कार्यवाही सुरू झाली आहे. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन सुरू केल्यावर ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी भूदान चळवळीला आपले जीवन वाहून घेतले होते. जयप्रकाशजींचा आदर्श नजरेसमोर ठेवून शिवरामभाऊ यांनी आपले उर्वरित आयुष्य सहकाराला अक्षरशः वाहून घेतले. डबघाईला आलेल्या कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघावर प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यावर अपार कष्ट आणि कल्पकतेने हा संघ उर्जितावस्थेला आणला. कणकवली तालुका खरेदी-विक्री संघ लिक्विडेशनमध्ये निघाल्यावर तेच कार्य करणाऱ्या तालुका शेतकरी संघाची उभारणी करून तो संघ उर्जितावस्थेला आणला. कुडाळ तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदार संघातून त्यांनी १९७४ मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रथमच लढवली होती. अशाप्रकारे शिवरामभाऊ यांची सहकारी क्षेत्रात काँग्रेस पक्षाशी जवळीक साधली गेली. नंतरच्या काळात काँग्रेस पक्षात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन ते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी झाले. १९७७ ते १९८३ सहा वर्षे ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. सलग दहा वर्षे त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्हा सहकारी बोर्डापासून, महामँगो, वृक्षशेती, मजूर, दूध यांसारख्या अनेक प्रकारच्या सहकारी संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन केल्या आणि उभ्याही केल्या. जिल्ह्यातील डबघाईला आलेल्या संस्थाही त्यांनी
उर्जितावस्थेत आणल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील पहिली सहकारी कौल उत्पादक संस्था तसेच जिल्हास्तरीय सहकारी वृक्षशेती संस्था ही त्याची चालती-बोलती उदाहरणे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडासारख्या दुर्गम आणि मागासलेल्या भागात डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या आर्थिक साहाय्यावरच उभा राहिला आहे. याचे श्रेय शिवरामभाऊंनाच आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवरामऊंचे सहकार क्षेत्रातील कार्य अतुलनीय होते. त्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकारी चळवळीची वाढ संख्यात्मक झाली नसली तरीही गुणात्मक झाली होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. शिवरामभाऊंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील शैक्षणिक गरज विचारात घेऊन माध्यमिक शाळा सुरू केल्या. कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे जयप्रकाश नारायण यांच्या नावाने पहिली माध्यमिक शाळा सुरू केली. कारिवडे (ता. सावंतवाडी) या गावी कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या स्मृत्यर्थ माध्यमिक शाळा, तर वाडोस येथे ग्रंथालयाच्या रुपाने प. पू. साने गुरुजींच्या स्मृत्यर्थ वाचन मंदिर उभारण्यास प्रोत्साहन दिले. सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय होते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com