लईराई देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

लईराई देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

83246
शिरगाव ः येथे धोंड भक्तगणांसह भाविकांना अग्निदिव्य साकारण्यासाठी तयार केलेला होमकुंड.
83248
शिरगाव ः लईराई देवीच्या दर्शनासाठी आलेले धोंड भक्तगण.

लईराई देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

शिरगावातील जत्रोत्साव ः हजारो भाविकांचे होमकुंडात अग्निदिव्य


सकाळ वृत्तसेवा
मये, ता. १२ : शिरगावातील (गोवा, डिचोली) प्रसिद्ध श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवास आज सकाळपासून अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी विविध धार्मिक विधी झाले. देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्गसह गोव्यातील लाखो भाविक, चौगुले मानकरी व हजारो धोंड भक्तगणांचा महापूर लोटला होता. जत्रास्थळी वाहन पार्किंगची चोख व्यवस्था केली होती. चोख पोलिस बंदोबस्तामुळे वाहतूक कोंडीही जाणवली नाही.

देवस्थान समिती, पोलिस दल, उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे जत्रा सुरळीतपणे सुरू झाली. भक्तगणांनी श्री लईराई देवीचे, मुड्डेर येथील मूळ स्थानाचे, पेठ व चिरेचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांनी शिरगावात देवीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. दुपारी मये आणि वायंगिणीच्या देवीचा कवळास लईराई देवीच्या मंदिरात दाखल झाला. त्याची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतरच जत्रोत्सवाला प्रारंभ झाला. देवस्थान समितीच्या सदस्यांनी ध्वनिक्षेपकावरून आवाहन करून गर्दीवर नियंत्रण मिळविले. वेगवेगळी दुकाने थाटल्याने परिसराला बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

देवीची पेठ, चिरा दाखल
दुपारी पुरोहितांच्या निवासस्थानातून लईराई देवीची पेठ व चिरा (उत्सवमूर्ती) मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर चिरा वाजतगाजत चौगुले मानकरी आणि धोंड यांच्या उपस्थितीत पवित्र मोडावर स्वार करून मुख्य मंदिरातून मुड्डी येथे मूळ अधिष्ठानात नेण्यात आली. तत्पूर्वी, लईराई मंदिरात धोंड भक्तगणांनी ‘हर हर महादेव’, ‘लईराई माता की जय’चा जयघोष केला. रात्री देवीची चिरा मुड्डेर येथून मुख्य मंदिरात आणून तिचे विधिवत पूजन करण्यात आले.
--
आकर्षक बेतनृत्य
धोंडगणांनी देवीचे दर्शन घेत पवित्र तळीवर स्नान करून सेवा रूजू केली. नवीन धोंडांही मुड्डेर येथे देवीच्या आदिस्थानावर नेण्यात आले. शेकडो भाविक डोक्यावर लाकडाच्या मोळ्या घेऊन होमखणाभोवती प्रदक्षिणा घालत होते. देवीची चिरा मुड्डेर येथे आणल्यानंतर मुख्य उत्सवास सुरवात झाली. संध्याकाळी धोंडगणांनी होमखणाभोवती आकर्षक बेतनृत्य केले.
---
मध्यरात्री अग्निदिव्य
मध्यरात्री हजारो धोंड भक्तगणांसह भाविकांनी होमकुंडात अग्निदिव्य साकारले. धोंड भक्तगणानंतर २२ चौगुले मानकऱ्यांसह शेवटी लईराईदेवीने अग्निदिव्याचा पण पूर्ण केला. हा डोळ्यांचे पारणे फेडणारा अद्भुत क्षण बघण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. त्यानंतर प्रमुख जत्रेची सांगता झाली. सोमवारी दुपारपासून कौलोत्सवास प्रारंभ होणार आहे. हा उत्सव गुरुवारपर्यंत सुरू राहील.
---
उत्कृष्ट आरोग्य सुविधा
देवस्थान समितीने पोलिसांच्या साहाय्याने वाहतूक आणि वाहन पार्किंग व्यवस्था चोख ठेवल्याने रस्त्यावर कोणताही अडथळा आला नाही. तत्काळ आरोग्य सेवेचीही यावेळी व्यवस्था करण्यात आली होती. प्रखर उन्हामुळे तापलेल्या रस्त्यावरून देवीचा चिरा घेऊन जाताना भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून टँकरने रस्त्यावर पाणी शिंपडण्याची व्यवस्था केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com