जानवली नदीकाठची गावे तहानलेलीच

जानवली नदीकाठची गावे तहानलेलीच

swt168.jpg
84025
जानवलीः येथील नदीचे पात्र कोरडे पडल्‍याने नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

जानवली नदीकाठची गावे तहानलेलीच
केटी बंधारे नसल्याने समस्या; हरकुळ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा, नदी पुनरूज्‍जीवन आराखडा रखडला
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ः तालुक्‍यातील गडनदीपात्रामध्ये ११ केटी बंधारे बांधण्यात आल्‍याने गडनदीकाठच्या गावांना पाणी टंचाईतून दिलासा मिळत आहे. मात्र, जानवली नदीपात्रात एकही केटी बंधारा नसल्‍याने मार्चपासूनच पाणी टंचाईची समस्या तीव्र होत आहे. त्‍याचबरोबर जानवली नदीचा जलपुर्नभरण आराखडाही रखडल्‍याने जानवली नदीकाठची जानवलीसह साकेडी, करंजे, नागवे, कोंडये, हरकूळ खुर्द आदी अनेक गावे तहानलेलीच राहिली आहेत.
सह्याद्री पर्वतामधील दाजीपूर येथून जानवली नदीचा उगम होतो. त्‍यानंतर फोंडाघाट, कोंडये, हरकुळ खुर्द, नागवे, करंजे, साकेडी, जानवली, कलमठ ही गावे घेत वरवडे येथे ही नदी गडनदीला जाऊन मिळते. सर्वसाधारणपणे ७२ किलोमीटर लांबी असलेल्‍या या नदीचे पाणलोट क्षेत्र १४७ चौरस किलोमीटर एवढे आहे. कणकवली शहर हद्दीत या नदीवर बंधारा झाला तर तब्‍बल सहा ते आठ किलोमीटरपर्यंत सलग पाच मिटर उंचीची पाणी पातळी या नदीमध्ये राहू शकते. सिंचनाबरोबरबरच जलपर्यटनाचेही उपक्रम या नदीपात्रात राबवले जाऊ शकतात. मात्र, त्‍याबाबत राजकीय पातळीवर उदासिनताच राहिली आहे.
राज्‍य शासनाने सात वर्षापूर्वी कोणातील चार नद्यांचा पूर्नजीवन आराखडा तयार केला होता. यात तालुक्‍यातील जानवली नदीचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ठिकठिकाणचे गाळ काढणे आणि तीन ठिकाणी कोल्‍हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे यांचा समावेश होता. त्‍याचबरोबर कुर्ली घोणसरी धरणाचा कालवा या नदीला जोडून नदी बारमाही प्रवाहीत करणे आदींचाही आराखडा तयार करण्यात आला होता. या कामांना निधी उपलब्‍ध झाल तर फोंडाघाट ते वरवडेपर्यंतची अनेक गावे जलसंपन्न आणि सुजलाम सुफलाम होणार आहेत. तसेच कणकवली शहरासह अनेक गावांची पाणी टंचाईमधूनही सुटका होण्याची शक्‍यता आहे.

चौकट
ऊस शेतीसह बागायती क्षेत्र पडीक
जानवली नदीपात्रात मुबलक पाणी असल्‍याने जानवली, नागवे तसेच कणकवली शहर हद्दीतील मोकळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जात होती. त्याचबरोबर अनेक धनिक मंडळींनी नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात जागा घेऊन अननस, काजू व इतर पिकांच्या बागायती केल्‍या होत्या. मात्र, गेली सहा-सात वर्षे मार्चपासूनच जानवली नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट होत असल्‍याने येथील ऊस शेती बंद केली आहे. तसे बागायत जमिनींचे क्षेत्र देखील पडीक होत चालले आहे.

चौकट
हरकूळ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा
गतवर्षी २३ जूनपर्यंत मान्सून लांबला होता. त्‍यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. जानवली नदीकाठच्या अनेक गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी आणावे लागले होते. त्‍यामुळे हरकूळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्यात आले होते. यंदा देखील जानवली नदीपात्र आटल्‍याने हरकूळ धरणाचे पाणी सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. मात्र, अद्याप पाणी सोडण्याबाबत कार्यवाही झालेली नाही.

कोट
जानवली नदीपात्रात मोठा पूल आणि केटी बंधाऱ्यासाठी आम्‍ही प्रयत्‍न केले होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पूल आणि केटी बंधारा एकत्रित उभारणीसाठी जानवली गणपतीसाणा येथे सर्वेक्षण देखील करण्यात आले. मात्र, तेथे केटी बंधाऱ्यासाठी योग्‍य जागा नसल्‍याने यंदा बंधारा उभारणी झाली नाही. मात्र, पुढील वर्षी जानवली नदीपात्रातील अन्य भागात बंधारा उभारणी होण्यासाठी सर्वेक्षण होण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
- बंडू हर्णे, माजी उपनगराध्यक्ष, कणकवली

कोट
जानवली नदीचे पात्र मार्च अखेरीस आटल्‍याने नागवे गावची नळयोजना ठप्प झाली आहे. तसेच खासगी आणि सार्वजनिक विहिरींनीही तळ गाठल्‍याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. त्‍यामुळे तातडीने हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडावे, अशी मागणी आम्‍ही पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
- संदेश सावंत, सदस्य, नागवे ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com