सावडाव धरणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

सावडाव धरणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

kan167.jpg
84111
सावडाव : येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन नियोजित धरणाचे काम बंद पाडले.


सावडाव धरणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले
मोबदला न देताच काम सुरू झाल्‍याने प्रकल्‍पग्रस्त आक्रमक; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचीही उपस्थिती
कणकवली, ता. १६ : जमिनीची मोजणी नाही, मोबदला नाही तसेच प्रकल्‍पग्रस्तांना विश्‍वासात न घेता सुरू केलेले सावडाव धरणाचे काम आज येथील ग्रामस्थ आणि प्रकल्‍पग्रस्त यांनी एकत्र येऊन बंद पाडले. यावेळी ठेकेदार आणि जलसंधारण अभियंत्‍यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर पुन्हा धरणाचे काम सुरू केल्‍यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
सावडाव धबधब्यापासून काही अंतरावर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने लघु धरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी तेथील जमिनीची, त्‍यामधील झाडे व इतर मालमत्ता यांची नोंद घेतली नाही. प्रकल्‍पग्रस्तांनाही कुठल्याही नोटिसा पाठविल्‍या नाहीत. त्‍यामुळे आक्रमक झालेल्‍या सावडाव येथील ग्रामस्थांनी धरण काम सुरू असलेल्‍या ठिकाणी मोर्चा काढला. तेथील माती उपसा काम बंद पाडले. तसेच डंपर, जेसीबी व इतर यंत्रणाही बाहेर जाण्यास भाग पाडल्‍या.
यावेळी सावडाव धरण प्रकल्पग्रस्त वैभव सावंत, नयना सावंत, विष्णू झगडे, आनंद नरसाळे, विद्याधर वारंग, संभाजी तेली, बाळकृष्ण चव्हाण, संदीप खांदारे, सतीश मोरे यांच्यासह शिवसेना उबाठा गटाच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम पालव सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, दिव्या साळगांवकर, माधवी दळवी आदी उपस्थित होते.

धरणाला विरोध नाहीः प्रकल्पग्रस्त शेतकरी
सावडाव धरण कामाला आमचा विरोध नाही. मात्र प्रकल्‍पग्रस्तांची किती जमीन त्‍यात बाधित होणार आहे आणि बाधित जमिनीचा मोबदला केव्हा देणार याबाबत शासनाने भूमिका स्पष्‍ट केलेली नाही. ठेकेदाराला हाताशी धरुन अधिकारी येथील प्रकल्‍पग्रस्तांची फसवणूक करत आहेत असा आरोप यावेळी प्रकल्‍पग्रस्तांनी केला.

कोट
धरणाला कुणाचाही विरोध नाही. फक्‍त प्रकल्‍प बाधितांच्या मागण्या शासनाने पूर्ण करायला हव्यात. पण जमीनीचा मोबदला शेतकऱ्यांना न देता धरणाचे जे काम चालु आहे. ते चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. मूल्यांकन न करताच झाडे व जमीन उदध्वस्त करण्याचे काम केल जात आहे. त्‍यामुळे आम्‍ही शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे.
- कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com