पान एक-हरकुळ परिसराला वादळाचा तडाखा

पान एक-हरकुळ परिसराला वादळाचा तडाखा

टीपः swt1631.jpg मध्ये फोटो आहे.
84141
हरकूळ ः वादळी पावसाने येथील अब्‍दुल करीम रेहमान यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले.

हरकूळ परिसराला वादळाचा तडाखा

जिल्ह्याला झोडपले; एक कोटीपर्यंत नुकसान

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ ः मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने आज जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह जिल्ह्याच्या अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. वैभववाडी, कणकवली, खारेपाटण परिसरांतील अनेक गावांमध्ये मोठी पडझड झाली. काही इमारतींच्या छप्परांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वीज खांब, वीज वाहिन्या उन्मळून पडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र खारेपाटण परिसरात दिसून आले. तालुक्‍यातील हरकूळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी या गावांना जोरदार वादळाचा तडाखा बसला. यात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० घरांचे नुकसान झाले आहे. या गावातील शेखवाडीमधील घरांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. शेखवाडीमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत २५ घरांचा पंचनामा झाला होता. त्याचप्रमाणे गावठाणवाडी व अन्य वाड्यांमध्येही सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी एक वाजल्यानंतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून विजांचा कडकडाट आणि वादळी वारा सुरू झाला. डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली. दुपारी अडीचनंतर जोरदार वारे वाहू लागले. यात वादळाचा सर्वाधिक फटका हरकूळ गावातील शेखवाडी आणि गावठाणवाड्यांना बसला. येथे वाऱ्याचा वेग प्रचंड होता. त्‍यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून दूर गेले, तर लगतच्या घरांचे पत्रे दुसऱ्या घरांवर पडून मोठे नुकसान झाले, तर काही घरांवर झाडे आणि फांद्या कोसळून नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रूकबरोबरच हळवलमध्ये २०, कळसुली गावात १२ आणि साकेडी गावात ७ घरांचे नुकसान झाले आहे. प्रत्‍येक घराचे सरासरी दीड ते चार लाखांपर्यंत नुकसान झाले असून सुमारे एक कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे, अरूळे यांसह विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.
करूळला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले.
वादळाच्या तडाख्यात अनेक घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत. तसेच घरावर झाडे कोसळूनही घरांची नुकसानी झाली आहे. शेखवाडी येथे अचानक आलेले वादळ आणि घरांचे छप्पर उडून जात असल्‍याने येथील नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती. काही नागरिकांनी तर लगतच्या स्लॅबच्या घरांमध्ये जाऊन आश्रय घेतला. वादळानंतर मुसळधार सरीही कोसळल्‍या. त्‍यामुळे शेखवाडी येथील अनेक घरांमध्ये अर्ध्या फुटापर्यंत पाणी साचले होते. त्‍यामुळे घरातील कपडे, धान्य तसेच इतर चीजवस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. या वादळात शबीराबी शेख (वय ७०) यांच्या घरावर झाड कोसळले. यात कौलाचा एक तुकडा त्यांच्या खांद्यावर कोसळून त्‍यांना दुखापत झाली. दरम्‍यान, जोरदार वारे, घरावर कोसळणारी झाडे तसेच अंगण व परिसरात वीज ताराही कोसळल्‍या असल्‍याने येथील नागरिकांची कुठे पळावे याबाबत मोठी त्रेधातिरिपीट उडाली होती. काही नागरिकांना घराबाहेर पडणे शक्‍य नसल्‍याने घरातच राहून देवाचा धावा करावा लागला होता. सुमारे पंधरा मिनिटांनंतर वादळ थांबले आणि त्‍यानंतर पाऊस सुरू झाला. त्‍यामुळे घरातील चीजवस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते; मात्र शेखवाडी भागात नागरिकांचे सुमारे ७० लाखांपर्यंत नुकसान झाल्‍याचा अंदाज आहे. शेखवाडी येथील मदरसा तसेच सुलतान पटेल, अब्दुल हमीद सुलेमान शेख, हाफिजा आलीशा पटेल, नासीर इस्माईल पटेल, शबिराबी शेख, नूरमहंमद रहमान शेख, अब्दुल करीम रेहमान शेख यांच्यासह अन्य पंधरा जणांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
-------------
चौकट
शेखवाडीवासीयांची रात्र काळोखात
शेखवाडी भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत. तसेच दहाहून अधिक वीज खांब आणि तारा तुटल्‍या आहेत. त्‍यामुळे वीज दुरुस्तीची कामे होईपर्यंत एक दोन दिवस शेखवाडीवासीयांना काळोखातच काढावे लागणार आहेत, तर अनेक घरांमध्ये मोडके छप्पर आणि घरात अजनूही पाणी असल्‍याने इथल्‍या नागरिकांनी नातेवाईकांकडे आधार घेतला आहे.
------------
चौकट
उशिरापर्यंत पंचनामे सुरू
महसूल विभागाकडे जसजशी नुकसानीची नोंद होत आहे तसतसे पंचनामे केले जात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तालुक्‍यात एकूण १५० घरांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज आहे. तसेच महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. एकूण नुकसानीचा आकडा उद्या (ता. १७) पंचनामे पूर्ण झाल्‍यानंतर समजेल, अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com