मालवणात उद्या गौतम बुद्ध जयंती

मालवणात उद्या
गौतम बुद्ध जयंती
Published on

मालवणात उद्या
गौतम बुद्ध जयंती
मालवण ः दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या मालवण तालुका व शहर शाखेच्यावतीने विश्वरत्न तथागत गौतम बुद्ध यांचा जयंती कार्यक्रम गुरुवारी (ता. २३) मालवण शहरातील बसस्थानकामागील समाज मंदिर येथे आयोजित केला आहे. यात सकाळी १० वाजता पंचशील ध्वजवंदन व पूजापाठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नागपूर येथील प्रवीण खोब्रागडे यांच्या हस्ते अनावरण व धम्म दिक्षा समारंभ, ११ वाजता जाहीर सभा, भन्ते संघबौधी यांचे धम्म प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, महासचिव आनंद धामापूरकर, जिल्हा संस्कार प्रमुख सूर्यकांत बिबवणेकर, सामाजिक कार्यकर्ते पी. के. चौकेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र पेंडूरकर, मालवण तालुका सक्रेटरी गंगाधर कदम उपस्थित राहणार आहेत. प्रास्ताविक शहर शाखा सेक्रेटरी सखाराम मालवणकर करणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जाधव असतील. सायंकाळी फनी गेम्स, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
..............
अवकाळी पावसाचा
फळ पिकांना फटका
ओरोस ः वैशाख वणव्यात होरपळलेल्या सिंधुदुर्गवासीयांना अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे; मात्र या पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील काजू, जांभूळ, कोकम आदी पिकांवर पाणी फेरले आहे. प्रामुख्याने जांभूळ व कोकम पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. याबरोबरच रायवळ आंबा उत्पादनही प्रभावित झाले आहे. गावठी काजूचे उत्पन्न एप्रिल आणि मेपर्यंत मिळते. अवकाळी पावसामुळे गावठी काजूही वाया जाणार आहे. ग्रामीण शेतकरी पावसाळी बेगमीसाठी आंबा व फणस पोळी, गरे, कोकम तयार करतात. यासाठी कडक उन्हाची गरज असते; मात्र सध्या दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पुरेशा उन्हाअभावी फळ पिकांचे नुकसान होत आहे.
---
वडाचापाट येथे
संयुक्त जयंती
मालवण ः भारतीय बौद्ध महासभा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट, वडाचापाट बौद्ध विकास मंडळ मुंबई, रमाई महिला मंडळ वडाचापाट यांच्या विद्यमाने २२ व २३ मे रोजी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. उद्या (ता. २२) सकाळी ९ वाजता बुद्धवंदना सूत्रपठण, फनी गेम्स स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता धम्म रॅली, रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजता धम्म ध्वजवंदन, ९ वाजता वंदना सूत्रपठण, सांस्कृतिक स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता स्वागत समारंभ व बक्षीस वितरण, रात्री १० वाजता विकास कासले प्रस्तुत भीम गर्जना ऑर्केस्ट्रा, मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे.
................
दाजी बटवलकरांचा
वेंगुर्ले येथे सत्कार
वेंगुर्ले : मांडवी खाडीत बुडालेल्या दोन शाळकरी मुलांपैकी तळवडेतील गौरव राऊळ या पंधरा वर्षीय मुलाचे प्राण वाचविणाऱ्या मच्छिमार दाजी बटवलकर यांचा वेंगुर्ले भाजपतर्फे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, दादा केळूसकर, भूषण सारंग, मनोहर तांडेल, किरण कुबल, श्याम खोबरेकर, विकी फर्नांडीस आदी उपस्थित होते.
.............
उंडील वैश्यगुरू मठाचा
रविवारी वर्धापन दिन
कणकवली ः उंडील (ता. देवगड) येथील वैश्यगुरू मठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २६) मठात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. हे कार्यक्रम वैश्यगुरू श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या उपस्थितीत होणार आहेत. सकाळी ९ वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२ वाजता वामनाश्रम स्वामी यांचे आशिर्वचन, १ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता चंद्रमौळीश्वर देवतांची पूजा होईल. वैश्य समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वैश्यगुरू मठ, उंडील व वैश्यगुरू सेवा समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com