वीज समस्या सोडवा; अन्यथा आंदोलन

वीज समस्या सोडवा; अन्यथा आंदोलन
Published on

84938

वीज समस्या सोडवा; अन्यथा आंदोलन

कुणकेरीतील ग्रामस्थांचा इशारा ः सावंतवाडीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः कुणकेरी गावात केवळ दोन ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे गावाला कमी दाबाने वीजपुरवठा होतो. या गावात विजेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासह वीज समस्यांबाबत येत्या चार दिवसांत त्वरित कार्यवाही करावी; अन्यथा शुक्रवारी (ता. २४) महावितरणच्या येथील कार्यालयासमोर आंदोलन छेडू, अशा इशारा कुणकेरी ग्रामस्थांनी दिला आहे.
कुणकेरी गावात १३ वाड्यांसाठी दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यात लिंगाचीवाडी येथील ट्रान्सफॉर्मरवरून जाणाऱ्या वीज वाहिनीवर सर्वाधिक ग्राहक आहेत. या सात वाड्यांमध्ये नेहमीच कमी दाबाने वीजपुरवठा होतो. अनेकदा विद्युत उपकरणे चालत नसल्यामुळे ती बिनकामाची ठरतात. त्यामुळे गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत अनेकदा महावितरणचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गावात येऊन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी सर्व्हे केला. जमीनमालकांनी जागाही उपलब्ध करून दिली; मात्र ट्रान्सफॉर्मरचा अद्याप पत्ताच नाही. याचाही ग्रामस्थांनी उपअभियंता कुमार चव्हाण यांना जाब विचारला. गावातील विद्युत वाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडी वाढलेली असून, देखभाल-दुरुस्ती करणे आवश्यक आहे. वीज वाहिन्यांवरील झाडी न तोडल्यास तसेच वाहिन्यांची दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात कुणकेरीवासीयांना सातत्याने विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वीही ट्रान्सफॉर्मर जळाल्याने कुणकेरीवासीयांना रात्र काळोखात काढावी लागली आहे. याकडे लक्ष वेधून याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी उपअभियंता चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. कुणकेरी गावातील विजेच्या समस्या ऐकून घेत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही उपअभियंता चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी मंगेश सावंत, मनोज घाटकर, माजी सरपंच विश्राम सावंत, नरेश परब, महादेव गावडे, एकनाथ सावंत, प्रकाश घाटकर, अभिजीत सावंत, अदिती सावंत, बाळकृष्ण सावंत आदी कुणकेरी ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com