पान एक-दोडामार्गला वादळी पावसाचा तडाखा

पान एक-दोडामार्गला वादळी पावसाचा तडाखा

टीपः swt2324.jpg मध्ये फोटो आहे.
85469
तळेवाडी : वादळी पावसामुळे घराचे झालेले नुकसान.

टीपः swt2325.jpg मध्ये फोटो आहे.
85470
कुडासे : वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झालेली काजूची झाडे. (छायाचित्रे ः संदेश देसाई)  

दोडामार्गला वादळी पावसाचा तडाखा

लाखोंची हानी : तालुक्याचा बहुसंख्य भाग अंधारात

सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. २३ : तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठी हानी झाली. मणेरी, उगाडे या भागात नुकसानाची तीव्रता जास्त आहे. यामुळे कालपासून (ता. २२) तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला. आज उशिरापर्यत तालुक्याचा बहुसंख्य भाग अंधारातच होता. नेटवर्क नसल्याने तालुकावासीयांच्या गैरसोयीत आणखी भर पडली.
मॉन्सूनपूर्व पावसाने काल सायंकाळी उशिरा तालुक्यात ठिकठिकाणी कहर माजविला. मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस लागत आहे. दररोज सायंकाळी पाऊस कोसळत आहेत. बुधवारी सायंकाळी ढग दाटून आले. विजा चमकू लागल्या आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहू लागला. क्षणार्धात वादळी पाऊस सुरू झाला. या वादळी वाऱ्यात तालुक्यातील अनेक ठिकाणी झाडांची, विद्युत पोलांची पडझड झाली. घरावर झाडे कोसळून काहींचे हजारोंचे नुकसान झाले. मणेरी येथे घरावर झाड पडून घराची कौले, सिमेंटचे पत्रे फुटले. मणेरी तळेवाडी ते आंबेली या मुख्य रस्त्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. काही ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून गेले. विद्युत खांब जमीनदोस्त झाले. वाहनांवर देखील झाडे पडल्याने वाहनांची नासधूस झाली. या पावसामुळे तळेवाडीतील सर्वच ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात विजेचा लपंडाव चालू आहे. अजूनही काही ठिकाणची वीज सुरळीत झाली नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात जात झालेल्या नुकसानीचा रितसर पंचनामा केला. मात्र, विद्युत प्रवाह गेले चोवीस तास खंडित होता.
कोलझर, उगाडे परिसरालाही वादळी पावसाने तडाखा दिला. उगाडेत झाडे उन्मळून पडल्याने मोठी हानी झाली. या भागात विजेचे खांब, वाहिन्या तुटून पडल्या. यामुळे कालपासून या पंचक्रोशीतील वीजपुरवठा खंडित आहे. तालुक्याच्या इतर भागात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आज या भागातील दुरुस्ती अपेक्षित गतीने झाली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात तब्बल तीन दिवसांहून अधिक काळ अंधारात राहण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
------------------
चौकट
दोडामार्ग शहर तीन दिवस अंधारात
तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले दोडामार्ग शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. मॉन्सूनपूर्व पडणाऱ्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गेले तीन दिवस हा खेळखंडोबा चालू आहे. त्यामुळे शहरातील नागरिक अंधारात चाचपडत आहेत. विद्युत विभागाने ही समस्या लक्ष घालून त्वरित सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. 
----------------
चौकट
शेकडो काजू कलमे कलंडली
वादळी पावसाचा फटका काजू शेतकऱ्यांनाही बसला आहे. या वादळी वाऱ्यात कुडासे येथील क्षेत्रात असलेले शेकडो काजू कलमे कलंडली. चार ते पाच वर्षांची काजूची झाडे जमीनदोस्त झाली. यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com