जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली

जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली

जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली

इर्शाद शेख ः जिल्हाधिकारी तावडेंचे वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्याकडे असणाऱ्या ऑर्थोपेडिक मशिनरी बंद पडल्याने रुग्णांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची नामुष्की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ओढवली आहे. या जिल्ह्यात चार मंत्री असूनही त्यांचे आरोग्य व्यवस्थेकडे झालेल्या अक्षम दुर्लक्षामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने गैरसोयीकडे तत्काळ लक्ष देण्यात यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेख, विजय प्रभू, अभय शिरसाट, प्रकाश जैतापकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आर्थोपेडिक रुग्णांच्या संदर्भातील शस्त्रक्रिया तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉ. ठाकूर व डॉ. चव्हाण यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापूर्वीपासून पार पडत होत्या; मात्र ऑर्थोपेडिक रुग्णांसाठी असलेल्या चार सी-आर्म मशिनरींपैकी दोन मशीन सुमारे दीड वर्षाच्या कालावधीपासून बंद पडलेल्या व भंगार झाल्या आहेत. उर्वरित दोन चालू ऑर्थोपेडिक सी-आर्म मशीन दोन महिन्यांपासून बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या आर्थोपेडिक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य ठिकाणी म्हणजे गोवा-बांबुळी व कणकवली या ठिकाणी पाठविण्यात येत आहेत. त्या अत्यावश्यक अशा सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजकडील शस्त्रक्रियेच्या मशिनरी दुरुस्ती वा नवीन आणण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्याचप्रमाणे प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालय यातील मशिनरी बंद पडत चालल्याने ऑर्थोपेडिक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य ठिकाणी पाठविण्यात येत आहे. अलीकडच्या काही दिवसांत सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजकडे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना शासनाच्या कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्याची नामुष्की सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजवर आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
...............
चौकट
कार्डियाक कॅथलॅबच्या जागेचा प्रश्‍न सोडवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर केलेली कार्डियाक कॅथलॅबसाठी निर्माण झालेला जागेचा प्रश्‍न शासकीय मेडिकल कॉलेजच्या नजीकच्या भागातील जमीन संपादित करून घेऊन ती लॅब होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे होते. तसे झाल्यास त्याची सेवा जिल्ह्यातील रुग्णांना मिळू शकली असती. विकासाच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याचे कोणतेही सोयरसुतक नाही, असा आरोप शेख यांनी केला आहे.
.............
चौकट
अन्यथा आंदोलन
आर्थोपेडिक आरोग्य सेवेची अत्यावश्यक सेवा आता तरी ती आर्थोपेडिक सर्व मशिनरी दुरुस्त करून तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अत्यावश्यक आरोग्य सेवेच्या कामास आचारसंहितेच्या प्रश्‍नाचा बाऊ करू नये; अन्यथा तमाम सर्वसामान्य जनतेच्या या महत्त्वपूर्ण सेवेसाठी नाईलाजाने काँग्रेसच्या माध्यमातून व जनतेच्या सहभागात तीव्र आंदोलन छेडले जाईल. याची नोंद घ्यावी, असा इशाराही दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com