निकाल लोकसभेचा, फैसला विधानसभेचा

निकाल लोकसभेचा, फैसला विधानसभेचा

सकाळ विशेष---लोगो

८७३६९

निकाल लोकसभेचा, फैसला विधानसभेचा

इन्ट्रो

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला हाती येईल. या निकालाचा ऊहापोह सुरू असतानाच आगामी राज्य विधानसभा निवडणुकीकडे डोळे लावून बसलेले आपली गणिते मांडू लागतील. सर्वसाधारणतः लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या एकावेळी झाल्या नाहीत तर त्यातील मुद्दे वेगवेगळे असतात. राज्याचे आणि स्थानिक प्रश्न प्रकर्षाने विधानसभा निवडणुकीत पुढे येतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विधानसभेची गणिते मांडली जातात, असे होत नाही; मात्र महाराष्ट्रातील या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात विधानसभा निवडणुकीबाबतचे अनेक फैसले दडलेले आहेत. शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी झालेल्या धक्कादायक हालचाली यामुळे एकमेकाचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राजकीय सोय म्हणून महायुती आणि आघाडी म्हणून एकत्र आले. लोकसभेसाठी यामुळे फारसे ताणेबाणे झाले नाहीत वा आघाडीतील अथवा युतीतील घटक पक्षांत संघर्ष झाला नाही तरी विधानसभेसाठी दावेदारी करताना हे टाळता येणे अशक्य आहे. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघांतील त्या त्या पक्षांचे फैसले हे या आधी कधी नव्हते एवढे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहेत. शिवसेना आणि शिवसेनेतील फुटीचा कोकणात पाय रोवून अधिकाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करणारा भाजप यांच्यापुढील चाली या लोकसभा निवडणूक निकालावर अवलंबून राहणार आहेत तसेच काही राजकीय अपरिहार्यताही समोर येणार आहे. त्यामुळे ''निकाल लोकसभेचा, फैसला मात्र विधानसभेचा'' असे चित्र आहे.

--------------


राजापुरात पारंपरिक प्रतिस्पर्धी आघाडी टिकवणार ?

राजापूरः राजापूर विधानसभा मतदार संघाच्या राजकीय आखाड्यात शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस गेली अनेक वर्ष पारंपरिक विरोधक आहेत. सध्या दोन्ही पक्ष आघाडीत असले तरी दोन्हीकडून पुन्हा एकदा मतदार संघावर दावेदारी केली जाण्याची शक्यता आहे तर, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अजित यशवंतराव यांचे नाव सातत्याने चर्चेत ठेवण्यात त्यांना यश आले आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीने संघटनात्मक बळ मिळणार आहे. शिवसेनेकडून (शिंदे गट) कंबर कसली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा फैसला लोकसभा निकालापेक्षा वेगळा असणार आहे. पाच वर्षापूर्वीच्या निवडणुकीतील विरोधक आणि सध्या महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेले शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतदार संघ निश्‍चितीवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, नव्याने स्थापना झालेला शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह मनसे आदी प्रमुख राजकीय पक्ष कार्यरत आहेत. पाच वर्षापूर्वी शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांनी तुल्यबळ लढत दिली होती. लोकसभेत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढले असले तरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर काँग्रेसने या मतदार संघावर केलेला दावा पाहता त्याच्यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस हे मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकण्याची शक्यता आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद वाढणार असून, भाजपच्या उल्का विश्‍वासराव, रवींद्र नागरेकर हे इच्छुक उमेदवार निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसत आहेत तर, किरण सामंत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची (शिंदे गट) चांगलीच ताकद आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अजित यशवंतराव यांचीही ताकद चांगली असून, त्यांचे गेल्या दहा वर्षापासून स्थानिक नेतृत्व आणि उमेदवार म्हणून नाव सातत्याने चर्चेत राखण्यात त्यांना यश आले आहे. महायुतीतील मित्रपक्षांनी अद्यापही मतदार संघावर दावा केला नसला तरी महाविकास आघाडीप्रमाणे त्यांच्यामध्येही मतदार संघावरील दाव्यावरूनही संघर्ष होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, लोकसभा निवडणुकीतील एकाच झेंड्याखाली मित्रपक्ष म्हणून कार्यरत असलेले राजकीय पक्ष विधानसभेत एकमेकांच्या विरोधात ठाकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य चौरंगी लढतीतील आव्हानाचा विद्यमान आमदार असलेला शिवसेना (उबाठा) पक्ष कसा सामना करणार? याची आतापासूनच साऱ्यांना उत्सुकता आहे.
--------

८७३४४
संदीप मालपेकर

कोट
राजापूर-लांजामध्ये शैक्षणिक, वैद्यकीय सुविधांसह अन्य विविध सुविधांचा अभाव आहे. उद्योगधंदे नसल्याने स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतो. मोठ्या संख्येने तरुणवर्ग नोकरीनिमित्ताने मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करत आहे. साहजिकच, त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वर्षागणिक रोडावत चालली आहे. निवडणुका येत-जात असतात; मात्र, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी मतदार संघाचा विकास आणि सर्वसामान्यांना अपेक्षित असलेल्या विविध सोयीसुविधांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- संदीप मालपेकर, अध्यक्ष, राजापूर तालुका व्यापारी संघ

--------------------------

लोकसभेची गणिते विधानसभेसाठी कोणाच्या पथ्थ्यावर ?

चिपळूण : लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीला साथ देणाऱ्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली होती. त्यामुळे लोकसभेची गणिते विधानसभेत त्यांच्या पथ्थ्यावर पडणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आणि महायुती म्हणून नेते एकत्र आले. भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. विधानसभेत महायुती झाली नाही तर शेखर निकम, सदानंद चव्हाण आणि भाजपचा संभाव्य उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. भाजपकडे चिपळूणमध्ये सक्षम उमेदवार नाही. युती न झाल्यास इतर पक्षातून नेता आयात करून ही जागा भाजपला लढवावी लागणार आहे. भाजपला केंद्रात यश मिळाले तर चिपळूणमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल. त्यासाठी मोदी कार्ड वापरले जाईल. उमेदवार निवडण्यासाठी लोकसभेसाठी मदत करणाऱ्या नेत्यांचा भाजपसमोर पर्याय असेल. लोकसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांनी कमळ या चिन्हाचा प्रचार केला. त्यामुळे भाजपचे कमळ हे चिन्ह ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्याचा फायदा भाजपला आगामी निवडणुकीत होणार आहे. लोकसभेसाठी निकम यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या फायद्याची की तोट्याची हे विधानसभा निवडणुकीत कळणार आहे. शरद पवारांबरोबर असलेला पारंपरिक मतदार या वेळी विनायक राऊत यांच्याबरोबर असल्याची हवा होती. त्यामुळे शिवसेनेचे नेते निवांत होते; मात्र निकम आणि महायुतीचे पदाधिकारी राणे यांच्या विजयासाठी परकाष्ठा करताना दिसले.
उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम, प्रशांत यादव या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. राऊत यांचे मशाल हे नवीन चिन्ह राष्ट्रवादीच्या मदतीने ग्रामीण भागापर्यंत पोहचले. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढल्यास तुतारी हे चिन्ह ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान या पक्षाच्या उमेदवारासमोर असणार आहे. माजी आमदार रमेश कदम हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे; परंतु ते किंगमेकरच्या भूमिकेत राहतील. महाविकास आघाडी झाल्यास ही जागा शिवसेना लढवणार की, राष्ट्रवादी काँग्रेस यावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
...........
rat२p२५.jpg
M८७३४६
प्रशांत यादव

कोट
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. विधानसभेतही महाविकास आघाडी कायम राहील. लोकांचा चांगला प्रतिसाद होता. लोक आता बोलू लागले आहेत. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून उमेदवार ठरवतील.

- प्रशांत यादव, राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गट
---------------

आघाडी, युतीतील तापातापी कायम राहणार

खेड : लोकसभेच्या निवडणुकीमुळे दापोली विधानसभा मतदार संघातील वातावरण चांगलेच तापले होते. लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून अनंत गीते तर महायुतीकडून सुनील तटकरे यांच्यात प्रचाराची जुगलबंदी पाहावयास मिळाली. या निवडणुकीदरम्यान अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले. महाविकास आघाडीचे उमेदवार गीते यांच्यामागे ठाकरेंवर अन्याय झाला, अशी सहानुभूतीची लाट होती. समाजाचा एक स्वच्छ चेहरा असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गीते यांनी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राळ उठवली. महायुतीचे उमेदवार तटकरे यांनी विकासाचा मुद्दा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या यांच्या चारशेपारसह जनतेच्या भावनिक मुद्द्यांना हात घालत ही निवडणूक लढविली. या निवडणुकीच्या तोंडावरच सहा महिन्यांपूर्वी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. दळवींच्या भाजपप्रवेशानंतर दापोली विधानसभा मतदार संघात महायुतीत सौम्य वादळी वारे वाहू लागले; परंतु लोकसभेची निवडणूक आणि मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवताना चारशेपारच्या नाऱ्यांसाठी भाजपसह शिंदेसेनेनेदेखील (शिंदे गट) काहीसे नमते घेतले; परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मागील बऱ्यांचशा गोष्टींची बेरीज-वजाबाकी होणार हे निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक जुन्या विषयांना फोडणी मिळणार आहे. तसे विविध विषय सोशल मीडियासह सार्वजनिक ठिकाणी चर्चिले जात आहेत. हे लोकसभेच्या निकालाच्या दृष्टिकोनातून सारे काही आलबेल दिसून येत आहे.
महायुतीचे सुनील तटकरे निवडून आले तर पुन्हा एकदा महायुतीचा वारू रायगड लोकसभा मतदार संघासह दापोली विधानसभा मतदार संघात धावू लागेल. स्थानिक मतदारांनी समाज सहानुभूतीपेक्षा विकासाला अधिक महत्व दिले यावर शिक्कामोतब होईल; परंतु महाविकास आघाडीचे गीते निवडून आल्यास यापुढे महायुतीची मतदार संघातील गणिते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेपेक्षा विधानसभेतील गणिते ही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्याची असलेली मतदारांशी नाळ यावर अवलंबून राहतात. त्यामुळे स्थानिक आमदार योगेश कदम यांनी गेल्या पाच वर्षांत मतदार संघात केलेला विकास आणि त्यांची मतदारांशी जुळलेली नाळ यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदार संघावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करणे हे देखील तितके सोपे नाही; परंतु या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे तटकरे निवडून आल्यास दापोली विधानसभा महायुतीला तितकी कठीण राहणार नाही; परंतु गीतेंचा विजय झाल्यास दापोली विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांला विजयश्री खेचून आणताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार.
---------------
कोट
लोकसभा निवडणुकीत उभे असलेले उमेद‌वार अनंत गीते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, राष्ट्रवादी शरद‌चंद्र पवार गट व काँग्रेस अशा इंडिया आघाडीतून उभे होते. ते निवडून आले तर ''उबाठा'' पक्षाला चांगलेच बळ मिळणार आहे; मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या सुनील तटकरे यांना शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी ताकद लावली होती. कदम यांचे राजकारण सर्वांनीच जवळून पाहिले आहे. शेवटच्या क्षणी ते पारडे आपल्याकडे फिरवू शकतात आणि यात ते यशस्वी झाल्यास शिवसेना शिंदेगटाला फार मोठी ताकद मिळेल.

- डॉ. काशिनाथ घडशी, भडगांव - खोंडे, खेड
----------

मताधिक्क्यावर ठरणार विधानसभेची समिकरणे

इंट्रो...

लोकसभा निवडणुकीचा निकाल अगदी तोंडावर आहे. सहा विधानसभा मतदार संघापैकी महायुतीला सर्वांत जास्त मताधिक्य मिळवून देणारा रत्नागिरी विधानसभा मतदार संघ हा एक आहे. शिवसेनेचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आपसूक त्यामुळे मोठी जबाबदारी आहे; परंतु अंतर्गत वादामुळे बंधूप्रेमांमध्ये काहीशी आलेली फारकत निवडणुकीवर परिणाम करणारी आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उबाठाची ताकद या मतदार संघात मोठी आहे. निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठल्याने त्यांनी सुद्धा येथून मोठे मताधिक्य घेण्याचा दावा केला आहे. कोण मताधिक्य घेणार, यावर भविष्यातील विधानसभेची समिकरणे ठरणार आहेत.
---------------

रत्नागिरी विधासभा मतदार संघावर गेली वीस वर्षे आमदार उदय सामंत यांचे अधिराज्य आहे. मूळ शिवसैनिकांची मोठी ताकद असलेला हा मतदार संघ मानला जातो. सर्वांत जास्त ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषददेखील शिवसेनेकडेच आहे. या स्वायत्ता संस्थांवर नेहमीच शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे; परंतु मंत्री उदय सामंत यांनी या मतदार संघात आपली वेगळी ताकद आणि वैयक्तीक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदारकीची निवडणूक लढली तरी राजकीय खेळी करून ते दोनवेळा निवडून आले. शिवसेनेत आल्यानंतर तर त्यांना तयार संघटना मिळाल्याने निवडून येण्याचा त्रासच झाला नाही; परंतु अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि सेनेचे दोन भाग झाले. शिवसेनेचे नाव गेले, चिन्ह गेले. या राजकीय घडामोडींमुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसवरदेखील हेच संकट ओढले गेले. फोडाफोडीच्या राजकारणानंतर प्रथमच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदार संघात वेगळेच चित्र होते. व्यक्तीगत ताकद असलेल्या आमदार उदय सामंत यांनी महायुती म्हणून नारायण राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी राबले; परंतु या वेळी त्यांनी दुसरी फळी असलेले पदाधिकारीदेखील विखुरले गेले. त्यामुळे तिथे त्यांची ताकद कमी झाली. आता त्यांच्यासोबत असणाऱ्यांच्या जनमताबाबत प्रश्नचिन्ह आहे. अंतर्गत वादामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत बंधूप्रेमामध्ये फारकत आली. या सर्व घडामोडी महायुतीला मारक ठरणाऱ्या आहेत.
भाजपचीदेखील स्वतंत्र वोटबॅंक आहे. तरुणांमध्ये मोदींची क्रेझ आहे. ब्राह्मण समाज, उच्चभ्रू, उद्योजक, मारवाडी समाज आदी नारायण राणे यांच्यामागे उभा असल्याचे सांगितले जात आहे; परंतु किरण सामंत आयत्यावेळी नॉट रिचेबल होणे हे भाजपच्या डोळ्यावर येणारे ठरले. भाजपचे माजी आमदार बाळ माने हे देखील गेली वर्ष-दीड वर्षे पक्षवाढीसाठी चांगले राबत होते; परंतु निवडणुकीच्या काळात आयत्यावेळी त्यांना बाजूला केल्याचे चित्र होते. मुळात महायुती म्हणून जी वज्रमूठ दिसायला हवी होती ती दिसली नाही. त्यात उमेदवार उशिरा जाहीर झाला. मोदी कार्ड आणि स्थानिक विषय व राजकारणावरच आता महायुतीची भिस्त आहे.
महाविकास आघाडीने मात्र उमेदवार निश्चित असल्याने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदार संघात दौरे सुरू ठेवले होते. त्यांचा सुप्त प्रचार अगदी घराघरापर्यंत गेला. उमेदवाराचा चेहरा, चिन्ह मतदारांपर्यत पोहचवण्यात त्यांना यश आले. आघाडीमध्ये एकमत आणि एकजूट असल्याने जोमाने आणि जोरात प्रचार झाला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण भागात शिवसैनिक या कुटील राजकीय खेळींना संतापला आहे. कट्टर शिवसैनिकांचा संताप मतांच्या रूपात राऊत यांना ताकद देणारा आहे. मुस्लिम समाजदेखील पेटून उठला. या निवडणुकीत प्रथमच त्यांनी उघड उघड मशाल चिन्हाला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले. कुणबी समाजाने शिवसेनेला पाठिंबा दिला, अशा महाविकास आघाडीच्यादेखील जमेच्या बाजू आहेत. ४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतर जो मताधिक्य देईल त्यावरूनच भविष्यातील विधानसभेची राजकीय समिकरणे ठरणार आहेत.
-----------
चौकट
रत्नागिरी विधानसभा मतदार संघ–
* एकूण मतदार २ लाख ८० हजार ९५७
* झालेले मतदार १ लाख ७२ हजार १३९
* ८५ हजार ५६४ पुरुष मतदार
* ८६ हजार ५७४ महिला मतदार
* इतर १
* ६०.७१ टक्के मतदान झाले
---------
-rat२p२७.jpg- उदय सामंत
कोट...
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त मताधिक्य महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनाच असेल.
- उदय सामंत, आमदार रत्नागिरी विधानसभा
--------------

rat२p२८.jpg-
८७३५०
विनायक राऊत

कोट...
कोणी किती काहीही बोलले तरी सिंधुदुर्गसह रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही आम्ही सर्वांत जास्त मताधिक्य घेऊ.
-विनायक राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)

-----------------

युती, आघाडी असो नसो लढत पारंपरिकच

गुहागर : गुहागर विधानसभा निवडणुकीसाठी महायुती झाली तर भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतील. महायुती झाली नाही तर भास्कर जाधव यांचा विधानसभेचा मार्ग सोपा असेल. ते मुलगा विक्रांत याला आमदार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हीच ती वेळ असेल.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर गुहागरमधील राजकीय गणिते बदलली आहेत; मात्र आघाडीला भास्कर जाधव आणि युतीला डॉ. विनय नातू यांच्याशिवाय पर्याय नाही. रायगडमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले तर गुहागर विधानसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. महायुती झाली तर विनय नातू यांच्याशिवाय तगडा उमेदवार महायुतीकडे नाही. हा मतदार संघ तीन तालुक्यांमध्ये विखुरलेला. माजी मंत्री रामदास कदम यांना मागील निवडणुकांचा अनुभव असल्यामुळे ते या मतदार संघातून शिंदे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार देतील, अशी शक्यता नाही. युती झाली नाही तरी महायुतीच्या सर्व नेत्यांचा उद्देश केवळ भास्कर जाधव यांचा पराभव करणे असल्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीकडून डमी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांना मिळणारी मते कमी करून नातू यांचे मताधिक्य वाढवण्याची काळजी महायुतीकडून घेतली जाईल. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव मात्र या वेळी गुहागरमधून नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. शिंदेगटाकडून कुणबी जातीचे कार्ड वापरला जाण्याची शक्यता आहे. भाजपचे विनय नातू यांचा गुहागर विधानसभा मतदार संघात सलग तीनवेळा पराभव झाला आहे. त्यांनी या वेळी पुन्हा विधानसभेची तयारी सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर भास्कर जाधव यांनी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला वेळोवेळी टार्गेट केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबाशी पंगा घेतला. महायुतीचे जिल्ह्यातील आणि राज्यातील नेते या वेळी भास्कर जाधव यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतील. याच परिस्थितीचा फायदा घेऊन विधानसभा जिंकण्याची संधी नातू यांच्यासमोर आहे; मात्र या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना कमळ सोडून प्रथमच घड्याळ या चिन्हाचा प्रचार करावा लागला. विधानसभेसाठी त्यांना पुन्हा कमळ चिन्ह घेऊन जनतेसमोर जावे लागणार आहे.
या वेळी भास्कर जाधव गुहागरसह चिपळूणची जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरताना त्यांनी साखरपेरणी केली आहे. मुलगा विक्रांत याला आमदार बनवणे हे त्यांच्यासमोर उद्दिष्ट आहे. सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती त्यासाठी पोषक असल्याचे भास्कर जाधव यांना वाटत असावे. यासाठी ते गुहागरसह चिपळूणचा दावा करत आहेत.
............
rat२p२६.jpg-
८७३४८
भास्कर जाधव

कोट
गुहागर विधानसभा मतदार संघातील जनता सुडाच्या राजकारणाला कधी बळी पडत नाही. मागील दोन वर्षे तर पूर्णपणे कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. तरीही लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना गुहागरमधून मताधिक्य मिळेल. कारण, इथला मतदार उद्धव ठाकरे, शरद पवार आणि माझ्यासोबत आहे.

- भास्कर जाधव, आमदार गुहागर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com