तंबाखूऐवजी पर्यायी पीक घेण्याबाबत जनजागृतीची गरज

तंबाखूऐवजी पर्यायी पीक घेण्याबाबत जनजागृतीची गरज

87353

तंबाखूऐवजी पर्यायी पीकाबाबत जनजागृतीची गरज
न्या. डॉ. अनिता नेवसेः चिपळूण न्यायालयात जागतिक तंबाखूविरोधी दिन
चिपळूण, ता. २ः तंबाखूमध्ये अनेक रसायने असून, निकोटीन हे रसायन हानिकारक व कर्करोग होण्यास कारणीभूत ठरते. तंबाखूच्या शेतीमध्ये विशेषतः स्त्रिया आणि मुले काम करताना आढळतात. त्वचेमधून निकोटीन शरीरात जाऊन गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. तसेच तंबाखूच्या शेतीमुळे पर्यावरणाची हानी होते. जागतिक आरोग्य संघटना धुम्रपान व तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू या समस्येचे निराकरण करण्यासाठी तंबाखूऐवजी पर्यायी पीक घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय, चिपळूण व बार असोसिएशन यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यकम झाला. या प्रसंगी न्या. नेवसे म्हणाल्या, सन २०२२ च्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर १३ ते १५ वर्षे वयोगटातील, ३७ दशलक्ष तरुण तंबाखू खात असल्याचे आढळून आले. इतर देशात या वयोगटातील तंबाखू सेवन करणाऱ्या मुलांची संख्या ११ टक्के व मुलींची संख्या १० टक्के आढळून आली. तंबाखू उद्योगांनी त्यांचा नफा टिकवून ठेवण्यासाठी तरुणांना लक्ष्य केले. उत्पादने सुलभ आणि परवडणारी ठेवतात तसेच जाहिरात, सोशल मीडिया आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित केले जाते.
सध्या तरुणांमध्ये निकोटीन पाउच व ई-सिगारेट वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. ई-सिगारेट हे इलेक्ट्रॉनिक निकोटीन प्रणालीचे एकप्रकारे उपकरण आहे, जे बॅटरीवर चालते व शरीरात निकोटीन पोहचवते; परंतु त्याचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. कोणत्याही स्वरूपातील तंबाखू सेवन आरोग्याकरिता हानिकारक असून त्यामुळे स्वरयंत्र, फुप्फूस, गळा, अन्ननलिका, तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. या वेळी दिवाणी न्यायाधीश एम. आर. काळे, अधीक्षक दांडेकर व आठल्ये, सरकारी वकील कदम, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com