रत्नागिरी-सोलापुरातील पर्यटकाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी-सोलापुरातील पर्यटकाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू

-rat2p35.jpg
87397
गणपतीपुळे : येथे समुद्रात बुडालेल्या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक व पोलिस आदी.

गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून
सोलापुरातील पर्यटकाचा मृत्यू

तिघांना वाचविण्यात यश; पोहताना घटना

रत्नागिरी, ता. २ : गणपतीपुळे येथे देवदर्शनाला आलेल्या सोलापूर-इसबावे येथील चार पर्यटक समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. त्यापैकी तिघांना वाचविण्यात जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिक व पोलिसांना यश आले; मात्र एकाचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अजित धनाजी वाडेकर (वय २५, रा. इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सोलापूर जिल्ह्यातील इसबावी येथून अजित वाडेकर, अजय बबन शिंदे (वय २३), सार्थ दत्तात्रय माने (वय २४) व आकाश प्रकाश पाटील (वय २५) असे चार तरुण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी आले होते. गणपतीपुळे येथे समुद्रात अंघोळ करण्याचा मोह टाळता आला नाही. प्रथम देवदर्शन न करता ते समुद्रात अंघोळीसाठी उतरले. पोहता पोहता खोल पाण्यात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात प्रवाहात अडकला. अजितला पाण्याबाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. किनाऱ्यावर असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, हवालदार कुणाल चव्हाण यांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अंजिक्य रामाणी, विशाल निंबरे आदींसह किनाऱ्यावरील येथील व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी पाण्यात उड्या घेतल्या. समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरुणांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध झाल्याने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्रातून देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
---------
चौकट
खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन
गणपतीपुळे येथे पर्यटन हंगामामुळे प्रचंड गर्दी आहे. विविध ठिकाणांहून आलेले पर्यटक समुद्राच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरतात; परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलत चालला आहे. पर्यटक व भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व गणपतीपुळे-जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com