मालवणात गुरुवारी ‘सह्याद्रीचा सिंह’

मालवणात गुरुवारी ‘सह्याद्रीचा सिंह’

87426

मालवणात गुरुवारी ‘सह्याद्रीचा सिंह’

भाऊ सामंत ः शिवचरित्रावर आधारित १२० कलाकारांचे महानाट्य

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या मालवणनगरीतील शिवप्रेमी मित्रमंडळाने छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या सांगता दिनानिमित्त शिवरायांच्या चरित्रावर आधारित ‘सह्याद्रीचा सिंह... राजा शिवछत्रपती’ या महानाट्याची निर्मिती केली आहे. तब्बल १२० स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेले हे महानाट्य गुरुवारी (ता. ६) रात्री ८.३० वाजता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सादर होणार आहे, अशी माहिती या महानाट्याचे निर्माते भाऊ सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भरड येथील हॉटेल ओऍसिसमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी भाऊ सामंत, गणेश मेस्त्री, समीर शिंदे, सुभाष कुमठेकर, श्रीराज बादेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सामंत म्हणाले, ‘‘या नाट्याची संकल्पना व निर्मिती माझी आहे. हा विचार मालवणमधील नाट्यप्रेमी नागरिकांसमोर मांडल्यावर त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत गेला. अनेक स्थानिक कलाकार यास जोडले गेले. पुणे येथील मोहन शेटे हे या महानाट्याचे लेखक आहेत. हे नाटक २०११ मध्ये घुमडे येथील श्री घुमडाई देवीच्या वार्षिक उत्सवावेळी नाटक सादरीकरणासाठी मोहन शेटे यांच्याकडून मी लिहून घेतले होते. त्यावेळी प्रथम घुमडे येथे हे नाटक सादर झाले होते. आता अनेक वर्षांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या नाटकाची पुन्हा निर्मिती आम्ही केली आहे. मालवण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारला, हाच किल्ला आता मालवणच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. मालवणवर शिवरायांचे मोठे उपकार आहेत. शिवरायांमुळेच आज हिंदू धर्म टिकला आहे. त्यांच्या या सर्व उपकारांतून उतराई होण्याचा व शिवरायांना मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या नाटकाच्या सादरीकरणातून करणार आहोत.’’
या महानाट्याचे दिग्दर्शन गणेश मेस्त्री करीत आहेत. तर प्रकाश योजना-शरद कांबळी, नेपथ्य-श्रीराज बादेकर, पार्थ मेस्त्री, संतोष मेस्त्री, सूत्रधार-समीर शिंदे, रंगभूषा व वेशभूषा-तारक कांबळी, रंगमंच व्यवस्थापन सुभाष कुमठेकर हे सांभाळत आहेत. या नाट्यात छत्रपतींच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग समाविष्ट आहेत. मोरयाचा धोंडा या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गचे झालेले भूमिपूजन, किल्ले सिंधुदुर्ग बांधणी आणि महाराजांची भेट, कोळी समाजातर्फे महाराजांचे झालेले उत्स्फूर्त स्वागत यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित १६ नृत्यांचा यात समावेश आहे. गोंधळी नृत्य, शेतकरी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य, जोगवा नृत्य, अनेक पोवाडे यांचा समावेश आहे. वय वर्षे दहा ते ७८ वर्षांपर्यंतच्या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. गेली दोन ते अडीच महिने या महानाट्यासाठी परिश्रम घेतले गेले. यामध्ये मालवण शहरासह आंगणेवाडी, घुमडे, गवंडीवाडा, तारकर्ली, देवबाग, कुडाळ, परुळे, सावंतवाडी या ठिकाणच्या एकूण १२० कलाकारांचा समावेश असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली. या नाट्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे. नाट्य सराव व सादरीकरणासाठी मामा वारेरकर नाट्यगृह उपलब्ध करून देऊन मालवण पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनीही सहकार्य केले आहे. यात सहभागी कलाकारांना कसलेही मानधन दिले जाणार नाही. महानाट्य सर्वांसाठी खुले आहे. महानाट्याच्या सादरीकरणावेळी स्वागताध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी संतोष जिरगे, उद्‍घाटक म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, देवदत्त सामंत, लेखक मोहन शेटे आदी उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com