सावंतवाडी ‘महसूल’चे हात ‘ओले’

सावंतवाडी ‘महसूल’चे हात ‘ओले’

87487

सावंतवाडी ‘महसूल’चे हात ‘ओले’

परशुराम उपरकर ः दंडात्मक कारवाई होत नसल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः पडवे-माजगाव (ता.सावंतवाडी) येथील अनधिकृत उत्खनन, आंबोलीतील अवजड वाहतूक तसेच इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रात होणारी बेकायदा डंपर वाहतूक, अनधिकृत खाणी, क्वॉरी ओव्हरलोड वाहतूक व तालुक्यात होणाऱ्या सर्व अनधिकृत प्रकारांकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर महसूलकडून कोणतीही दंडात्मक कारवाई अद्याप केलेली नाही. महसूल प्रशासनाचे हात ओले झाले आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी केला. तसेच याप्रकरणी येथील तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली.
पडवे-माजगाव येथील अनधिकृत मायनिंग उत्खनन तसेच सावंतवाडी तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात श्री. उपरकर यांनी तहसीलदार पाटील यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, मंदार नाईक, विजय जांभळे, प्रवीण गवस, सुरेंद्र कोठावळे, आबा चिपकर, नंदू परब, सुनील नाईक, संदेश सावंत, स्वप्नील जाधव, ज्ञानेश्वर नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपरकर यांनी महसूल विभागाला लक्ष्य करताना सावंतवाडी तालुक्यात शासनाचे नियम डावलून बरेच गैरप्रकार होत असून, त्यावर महसून विभागाचा अंकुश नाही. ओव्हरलोड वाहतूकप्रश्नी कारवाई करण्याचा दिखावा करण्यात आला; मात्र आतापर्यंत दंडात्मक कारवाई करून तहसीलदारांनी किती महसूल शासनास मिळवून दिला, हे पुराव्यांसहित सादर करावे. आंबोली घाट अवजड वाहतुकीसाठी बंद असूनही पोलिस, महसूल प्रशासन व आर.टी.ओ. विभागाच्या आशीर्वादाने खुलेआम रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू आहे. त्यावर प्रांताधिकारी, तहसीलदारांनी काय कारवाई केली, असा प्रश्न उपरकर यांनी केला.
पडवे-माजगाव इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रात झालेल्या अनधिकृत मायनिंग उत्खननावर प्रांत, तहसीलदार, महसूल प्रशासनाने कोणती दंडात्मक कारवाई केली? हे मायनिंग अनधिकृतरित्या दोडामार्ग तालुक्यात डंप करून रेडी पोर्टपर्यंत पोहोचविले गेले. या सर्व गैरप्रकाराला महसूल प्रशासनाचा आशीर्वाद होता. लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दीड हजार डंपरवर कोणती दंडात्मक कारवाई केली? सावंतवाडी तालुक्यात अनधिकृत चिरेखाणी, क्वॉरी सुरू आहेत. त्यावर आतापर्यंत तहसीलदारांनी किती दंडात्मक कारवाई केली? असा प्रश्नांचा भडिमार उपरकर यांनी केला. चिरेखाणींची तपासणी करून दिलेल्या पासपेक्षा जास्त खोल उत्खनन सुरू आहे. विनापरवाना वाहतूक सुरू आहे. त्याबाबत तहसीलदारांनी पथक नेमले होते. त्या कारवाईचे काय झाले? तालुक्यातील मळेवाड, कोंडुरे, धाकोरे, आजगाव, तळवणे भागात अनधिकृत चिरे उत्खनाबाबत ग्रामस्थांच्या तक्ररी आल्या आहेत. त्यावर महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. या खाणींवर कारवाई न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना व जबाबदार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन खाणीच्या ठिकाणी धडक देऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला.
..........
चौकट
कारवाईची मोहीम लवकरच हाती
यावेळी तहसीलदार पाटील यांनी, तालुक्यातील प्रशासनाच्या व्यस्त कामामुळे कारवाई संदर्भात लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, असे उत्तर दिले. यावर उपरकर यांनी आपले इतर कर्मचारी काय करतात? असा प्रश्‍न केला; मात्र आता कारवाईची मोहीम हाती घेतली जाईल, असे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी श्री. उपरकर व उपस्थितांना दिले. केवळ प्रशासकीय काम करण्यासाठी महसूल विभाग नाही, जिथे शासनाचा महसूल बुडत आहे, तिथेही लक्ष घालून प्रांत, तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई करून शासनाला जास्त महसूल उपलब्ध करून दिला पाहिजे, असे खडेबोल श्री. उपरकर यांनी सुनावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com