‘रेन ट्री’च्या धोकादायक फांद्या छाटल्या

‘रेन ट्री’च्या धोकादायक फांद्या छाटल्या

87535

‘रेन ट्री’च्या धोकादायक फांद्या छाटल्या

सावंतवाडीत काम ः महामार्गावर होती अपघाताची भीती

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः सार्वजनिक बांधकाम व महावितरण कंपनीच्या माध्यमातून जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी शहर न्यायालयाच्या आवारातील रस्त्यावर वीज वाहिन्यांवर येणाऱ्या संस्थानकाळापासून असलेल्या ‘रेन ट्री’च्या फांद्या छाटण्यात आल्या. याबाबत महावितरण किंवा बांधकाम विभागाने कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वीजपुरवठाही खंडित ठेवण्यात आला होता.
येथील न्यायालय परिसरात असलेल्या ब्रिटिशकालीन ‘रेन ट्री’ या भल्या मोठ्या वृक्षाच्या आज फांद्या छाटण्यात आल्या. या कामाला सकाळपासून सुरुवात झाली. त्यामुळे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरून होणारी वाहतूक बाजारपेठेतून वळविण्यात आली. एकाच बाजूला सर्व वाहतूक वळविल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. झाड तोडण्यासाठी वीज वाहिन्या उतरून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य नागरिक हैराण झाले.
सावंतवाडी शहरात असलेली जुनाट व धोकादायक झाडे तोडण्यात यावीत, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सावंतवाडी न्यायालय परिसरात असलेले झाड तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळपासून या कामाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी त्या झाडावर मधाचे मोठे पोळे असल्यामुळे रात्रीपासून मधमाश्यांना पळविण्यासाठी बराच काळ प्रयत्न सुरू होते. या झाडाच्या रस्त्याच्या बाजूने असलेल्या फांद्या तोडण्यात आल्या.
..............
चौकट
वीजपुरवठा खंडित, वाहतुकीचीही कोंडी
या कामासाठी राजवाड्यासमोरील महामार्गावरून होणारी वाहतूक रोखण्यात आली व बाजारपेठमार्गे वळविण्यात आली. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुसरीकडे झाड तोडण्यासाठी वीज वाहिन्या उतरविल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे ऐन गर्मीच्या हंगामात अंगाची लाही लाही झाली. याबाबत संबंधित यंत्रणांनी पूर्वसूचना देणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात जाणारा मार्गही काही काळ बंद ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com