पान एक-सिंधुदुर्गात मॉन्सूनची चाहुल

पान एक-सिंधुदुर्गात मॉन्सूनची चाहुल

सिंधुदुर्गात मॉन्सूनची चाहुल
दमदार सरी; वातावरणात मोठे बदल

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ ः जिल्ह्याच्या बहुतांशी भागात आज मॉन्सूनपूर्व पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण पावसाळी बनले. अरबी समुद्रातून मॉन्सूनचा प्रवास वेगाने होत असून, पुढील एक-दोन दिवसांत मॉन्सून सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्याला ११ ते २४ मे या कालावधीत मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. गेले पाच-सहा दिवस जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसदृश वातावरण होते. उकाड्याने नागरिक हैराण होते; मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण झाले. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती होती. दुपारी एकपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनपूर्व पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. काही भागात किरकोळ गडगडाट झाला; मात्र अन्यत्र मॉन्सूनप्रमाणे पावसाच्या सरींचा वर्षाव झाला. वैभववाडी तालुक्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात अर्धा तास पाऊस झाला. कणकवलीत विजांच्या लखलखाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सावंतवाडी तालुक्याच्या बहुतांशी भागात पावसाळी वातावरण होते. त्यानंतर सायकांळी चारच्या सुमारास सर्वत्र पाऊस झाला. काही भागात रिमझिम पाऊस सुरू होता. किनारपट्टी भागात देखील पावसाचे वातावरण होते. पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला होता.
मॉन्सून केरळमध्ये ३१ मे ऐवजी ३० मे रोजी दाखल झाला. कोकणात सहा जूनला मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज होता; परंतु केरळमध्ये एक दिवस दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. अरबी समुद्रातही मॉन्सूनची प्रगती चांगली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात एक-दोन दिवसांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com