‘कुडाळ मतदारसंघात 
भाजपचे वर्चस्व सिद्ध’

‘कुडाळ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व सिद्ध’

‘कुडाळ मतदारसंघात
भाजपचे वर्चस्व सिद्ध’
कुडाळ ः नारायण राणे यांच्या रुपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद व उत्साह संचारला आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात सुमारे २८ हजारांचे मताधिक्य मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी व्यक्त केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली, त्याचे हे फलित आहे. देशातही ‘एनडीए’ला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पुन्हा ‘एनडीए’चे सरकार स्थापन होणार यात शंका नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
..............
‘प्रवेश पात्रता’चा
निकाल १० जूनला
कणकवलीः राज्य शासनाच्या सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या विविध सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल १० जूनपासून लागणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडे जाणाऱ्या मुलांचा एमएचटी-सीईटी या परीक्षेचा ‘पीसीएम’ आणि ‘पीसीबी’ ग्रुपचा निकाल सोमवारी (ता. १०) जाहीर होणार आहे. तसेच बीएपीएससी- बीएड सीईटीचा निकाल १२ तारखेला जाहीर होईल. बीएचएम सीईटीचा निकाल ११ ला, तर ‘डीपीएन’ आणि ‘पीएचएन’ परीक्षेचा निकाल १२ तारखेला जाहीर होणार आहे. एमएचएम- सीईटीचा निकाल १३ ला, तर नर्सिंग प्रवेशसाठी ज्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे, त्या परीक्षेचा निकाल १६ तारखेला तसेच एलएलबी-५ सीईटीचा निकालही १६ जूनला आहे. बीसीए, बीबीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या विषयाच्या सीईटीचा निकाल १७ जूनला संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.
-----------
वाळू नेणारा डंपर
कळणेत उलटला
दोडामार्ग ः दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावर कळणे येथील एका अवघड वळणावर वाळू वाहतूक करणारा डंपर उलटून अपघात झाला. अपघातात चालक बालबाल बचावला. डंपरचे बरेच नुकसान झाले. दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा एक डंपर कळणे येथे आला असता, चालकाला अवघड वळणाचा अंदाज न आल्याने अपघात होऊन डंपर उलटला. यात चालक बचावला; मात्र डंपरचे मोठे नुकसान झाले. अपघाताचे वृत्त कळणे सरपंच अजित देसाई यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पोलिसांना कल्पना दिली.
--
कनेडीत शेतकऱ्यांना
पावसाची प्रतीक्षा
कनेडी ः गेले काही दिवस हुलकावणी देणाऱ्या पावासाचे लवकर आगमन व्हावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. काही शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे. अशा पेरणीला पावसाची आवश्‍यकता आहे. तसेच काही गावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी नदी, नाले कोरडे पडले आहेत. प्रतिवर्षीच्या तुलनेत यंदा दहा ते पंधरा दिवसा उशिरा पाऊस होत आहे. तसेच मृग नक्षत्र केवळ दोन दिवसांवर आले आहे, तरीही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
-------
मोकाट जनावरांचा
कणकवलीत त्रास
कणकवली ः शहरात सध्या मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. बाजारपेठेतील भाजी, फळे खाण्यासाठी गावातील शेतकऱ्यांची जनावरे बाजारात फिरत आहेत. रात्री रस्त्यावर बसणारी मोकाट जनावरे वाहन चालकांना धोकादायक आहेत. शहरातील नरडवे रस्ता, तेळीआळी, शिवाजीनगर, बांदकरवाडी या परिसारत रात्री जनावरांचा वावर वाढला आहे. नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com