चिपळूण-खाडीपट्ट्यातील गावांमध्ये पारंपरिक मासेमारी

चिपळूण-खाडीपट्ट्यातील गावांमध्ये पारंपरिक मासेमारी

88124
------------
खाडीपट्ट्यातील गावांमध्ये पारंपरिक मासेमारी
समुद्रात मच्छीमारीला बंदी; छोट्या व्यावसायिकांना लाभ
चिपळूण, ता. ५ः शासनाने मच्छीमारी बंद कालावधी लागू केला आहे. त्यामुळे आता खाडीकिनारी पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी केली जाणार आहे. दापोली तालुक्यातील आंजर्ले, दाभोळ आणि चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी खाडीत पावसाळ्यात पारंपरिक मच्छीमारी होणार आहे.
कांडाळी जाळीच्या साह्याने मासेमारी केली जाते. हर्णै परिसरातील मच्छीमारांना आंजर्लेची खाडी जवळची वाटते. गुहागर परिसरातील मच्छीमारांना दाभोळची खाडी जवळ आहे. चिपळूणमधून जाणाऱ्या वाशिष्ठी नदीवर खेड व चिपळूण भागातील मच्छीमार मासेमारी करतात. जुलै अखेरपर्यंत मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ असते. याच दरम्यान माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे शासनाकडून दोन महिने मासेमारीवर बंदी आणली जाते; मात्र या दोन महिन्यात काहीच काम नसल्यामुळे मासेमार बोटींची मशागती करून पावसाळी शेतीची कामे करतात; मात्र ज्यांच्याकडे शेती नाही असे मासेमार खाडीकिनारी जाऊन मासेमारी करतात. पावासाळ्यात वादळ झाल्यानंतर समुद्रातील मासे समुद्राच्या दिशेने येणाऱ्या गोड पाण्याच्या दिशेने जातात. त्यामुळे हे मासे समुद्रातून खाडीत येतात. छोटे व्यावसायिक पावसाळ्यात खाडीकिनारी व समुद्रकिनारी मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करतात.

चौकट
सुळामासा, बांदोशी माशांची मागणी
विशेषतः पावसाळ्यामध्ये सुळामासा, बांदोशी हे मासे मिळतात. सुळामासा हा मधुमेह रुग्णांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतो. मधुमेहाचा रुग्ण या माशाचे आहारामध्ये सेवन करतात. यामुळे पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या सुळामाशाला मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांमधून मागणी असते. गावातील खाडीकिनारी खडकी मासेही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतात.

कोट
एक जूननंतर सर्वच बोटी शाकारून समुद्रकिनारी दोन महिन्यांसाठी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे. यावर्षी मासेमारी व्यवसाय समाधानकारक नसल्यामुळे मच्छीमारी बांधवांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांची होत आहे. परप्रांतीय ट्रॉलरचा उद्रेक व अनेक वादळांमुळे मत्स्य व्यवसायावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
- अशोक पावसे, मच्छीमार, दाभोळ

कोट
दापोली तालुक्यातील मत्स्य व आंबा आणि पर्यटन व्यवसाय या तीन व्यवसायावर दापोलीची आर्थिक नाडी अवलंबून असते. यावर्षी मत्स्य व्यवसाय तोट्यातच गेल्याचे सांगण्यात येत आहे. परप्रांतीय व फास्टर ट्रॉलरच्या अतिक्रमणामुळे स्थानिक मच्छिमारांना फटका बसला आहे. हर्णै परिसरातील गावांमध्ये २० हजार मच्छीमार आहेत. या व्यवसायाशी निगडित हजारो लोक आहेत. पावसाळ्यात मच्छीमारांना काहीच काम नसते त्यामुळे ते खाडीकिनारी जाऊन पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून गुजराण करतात.
- गोपीचंद चौगुले, हर्णै मच्छीमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com