गीते पराभूत; पण ‘गुहागर’मध्ये आघाडी

गीते पराभूत; पण ‘गुहागर’मध्ये आघाडी

P२४M८७९९९
गुहागर विधानसभा मतदारसंघ
-----------

गीते पराभूत; पण ‘गुहागर’मध्ये आघाडी

भाजपला पुढील लढाई कठीण; तटकरेंचा विजय हा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ५ : रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. यावेळीही रायगडमधून त्यांना महायुतीची साथ मिळाली. गुहागर आणि दापोली विधानसभा क्षेत्राने मात्र मतांचा कौल अनंत गीतेंच्या पारड्यात टाकला. गुहागरमध्ये गीतेंना २७ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे आमदार जाधव यांनी गीतेंच्या प्रचाराचे केलेले सुक्ष्म नियोजन यशस्वी झाले आहे. केंद्रात एनडीएला ३०० पारही करता आले नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच भक्कम राहिली. त्यामुळे तटकरे विजयी झाले असले तरी गुहागरमधील महायुतीच्या गोटात शांतताच पाहायला मिळाली.
लोकसभेतील मतमोजणीचे कल समोर येऊ लागले तेव्हा सकाळच्या वेळात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सामाजिक माध्यमांमधुन वेगवेगळ्या ठिकाणच्या निकालांची चर्चा सुरू होती. सायंकाळी रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे विजयी झाल्याच्या बातम्या झळकु लागल्या तरीही गुहागर तालुक्यातील महायुतीमधील वातावरण थंडच होते.
रायगडमधून तटकरे विजयी झाले तरीही गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीला असलेली किमान मताधिक्याची शक्यताही फोल ठरली. गुहागर विधानसभा मतदारसंघात गुहागर मतदारसंघ अनंत गीतेंना ७४ हजार ८२६ मते मिळाली तर सुनील तटकरे यांना ४७ हजार ३० मते मिळाली. अनंत गीतेंना २७ हजार ७९६ मते अधिक मिळाली. येथून किमान २५०० ते ३ हजार मतांचे मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा येथील भाजप कार्यकर्ते करत होते. गीतेंच्या मताधिक्क्याने महायुतीच्या वल्गना पोकळ ठरल्या. त्यातच महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा असल्याचे निकालातून समोर आले. गुहागर विधानसभा क्षेत्रातील सहा महिन्यानंतरची लढाई अधिक कठीण असल्याची जाणीव भाजप कार्यकर्त्यांना झाली आहे. या जाणीवेनेच भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंचा विजय आणि रायगडमधून तटकरेंचा विजय झाल्याने आनंद व्यक्त करण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांपर्यंत पोचल्या आणि सायंकाळी सहानंतर उसने अवसान आणून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुहागर नाक्यात फटाके फोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com