वन कर्मचाऱ्यांना वृक्ष संवर्धनाचे धडे

वन कर्मचाऱ्यांना वृक्ष संवर्धनाचे धडे

88194

वन कर्मचाऱ्यांना वृक्ष संवर्धनाचे धडे
सावंतवाडीत कार्यशाळाः वनविभागाच्या उपक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः जगभर साजरा होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या वनरक्षक तसेच सावंतवाडी व आंबोली परिक्षेत्रातील वन अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून वनस्पतीतज्ज्ञ मिलिंद पाटील (पिंगुळी-कुडाळ), अधीक्षक भूमिअभिलेख सुजितकुमार जाधव तसेच सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या संकल्पनेतून वनविभागामध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, नव्याने वन विभागामध्ये रुजू झालेले वनरक्षक यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हामध्ये आढळणारा, पश्चिम घाटातील दुर्मिळ, संकटग्रस्त प्रजातीतील विविध वनस्पतींची ओळख व्हावी तसेच त्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून, दुर्मिळ तसेच संकटग्रस्त वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी काम करणारे वनस्पतीतज्ज्ञ श्री. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती प्रजाती, त्यांना कसे ओळखावे, त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांना जतन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच रोपवाटिकेच्या माध्यमातून त्यांचे संवर्धन व संरक्षण कसे करता येईल, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
वन कर्मचाऱ्यांनी देखील प्रश्नोत्तराच्या तासात आपल्या जंगल फिरती दरम्यान दिसलेल्या दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या विषयी आपल्या शंका, प्रश्न मार्गदर्शकांना विचारून त्यांचे निरसन करून घेतले. ही कार्यशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळत असलेल्या दुर्मिळ व संकटग्रस्त वृक्ष प्रजातींच्या संरक्षण व संवर्धनासाठी नक्कीच उपयोगी ठरेल, असा श्री. पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेचे नियोजन सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक महादेव गेजगे व सावंतवाडी परिक्षेत्र कर्मचारी यांनी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com