दसपटी विभागात भाजपच्या जोरदार मुसंडीने आश्चर्य

दसपटी विभागात भाजपच्या जोरदार मुसंडीने आश्चर्य

दसपटी विभागात भाजपची मुसंडी

महाविकास आघाडी निष्फळ ; भाजपच्या नेत्याविना यश

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ५ ः चिपळूण विधानसभा मतदार संघातून नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले नसले तरी दसपटी विभागात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाकरेगटाच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दसपटी भागात भाजपचा एकही खंबीर नेता नाही. तरीही राणेंना इतकी मते कशी मिळाली? येथे आमदार शेखर निकमांचे नेतृत्व वरचढ ठरले की, महाविकास आघाडी निष्फळ ठरली याबाबत राजकीय चर्चा सुरू आहेत.
चिपळूण विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना १९ हजार ९६१चे मताधिक्य मिळाले. हा मतदार संघ पूर्वीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आलटूनपालटून संधी देत आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांना ५५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी ५५ हजाराचे मताधिक्य तोडून २९ हजाराची आघाडी घेतली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर या मतदार संघातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलेले होते. दसपटी विभागात माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, मंगेश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे आदींना मानणारा मोठा वर्ग आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कदम, शिरीष शिंदे, स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे आदी मंडळींची ताकद आहे. तुलनेत भाजप येथे फार कमी आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीचा तालुक्यातील इतर ग्रामीण भागात विनायक राऊत यांना मोठा फायदा झाला; मात्र दसपटी भागात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली नाही. ही सहानुभूती कमी करण्यासाठी आमदार निकम यांच्यासह शिंदे गटाच्या शिवसेनेने संपूर्ण तालुक्यात प्रयत्न केले. त्याप्रमाणे दसपटीसह सावर्डे व खाडीपट्ट्यातील काही गावांमध्ये राणे यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे.
------
या ठिकाणी सर्वाधिक मतदान...
राणे यांना सर्वाधिक मतदान झालेल्या गावांमध्ये दसपटी विभागातील आकले, तिवडी, कादवड, वालोटी, दळवटणे, स्वयंदेव, कळकवणे, ओवळी, अडरे, वेहेळे, सावर्डे विभागातील कोंडमळा, सावर्डे, कुशिवडे, बिवली, खेर्डी, डेरवण, माडंकी, कोसबी, दुर्गवाडी, दुर्गवाडी खुर्द या गावांचा समावेश आहे तसेच शहरी विभागात गोवळकोट, बापटआळी, वडनाका, चिंचनाका, मार्कंडी, पाग, खेंड, काविळतळी, बहादूरशेखनाका आदी मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान राणे यांना झाले आहे.
...........
राऊतांचा पराभव जिव्हारी

विनायक राऊत यांना चिपळूणमधून मताधिक्य मिळाले असले तरी त्यांचा पराभव येथील पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे. तालुक्यातील काही वाड्यावस्त्यांमध्ये राणेंना सर्वाधिक मतदान झाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. त्यातून दसपटी विभागातील उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख मंगेश शिंदे यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com