जैतिर उत्सवाला जल्लोषात प्रारंभ

जैतिर उत्सवाला जल्लोषात प्रारंभ

88506

जैतिर उत्सवाला जल्लोषात प्रारंभ
भाविकांची गर्दीः ११ दिवस चालणार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ः दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील जैतिर उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत श्री जैतिर देवाचे दर्शन घेतले. १ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता १५ जूनला कवळासाने होणार आहे.
श्री देव जैतिर हे तुळस गावचे प्रमुख दैवत असून, त्याचा वार्षिक उत्सव आजपासून सुरू झाला. यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट केली आहे. आज उत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित मुंबई, पुणे, रत्नागिरी, कर्नाटकसह गोव्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी श्री देव जैतिराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
उत्सवानिमित्त विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, खेळणी, गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मंदिर परिसरात लावले आहेत. या जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा उत्सव पावसाळ्याच्या प्रारंभी येत असल्याने शेतीच्या अवजारांसह शेतकरी वर्गाला उपयोगी अशी बाजारपेठ याठिकाणी भरते. शेती यांत्रिकीकरणामुळे अलिकडे पारंपरिक अवजारांची विक्री कमी झाली आहे; मात्र या उत्सवात दुपारी २ नंतर खऱ्या अर्थाने या उत्सवाला सुरुवात झाली. देवघरातून अवसरी येत श्री देव जैतीराने मंदिरासमोर मांडावर येत खेळ केला तर यानंतर मनाप्रमाणे प्रत्येक मानकऱ्यांनी मांडावर खेळ केले. हे दृश्य पाहायला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता १५ जूनला कवळासाने होणार असून पुढील ११ दिवस गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.
गोव्याचे माजी मंत्री मिलिंद नाईक, मनीष दळवी, विशाल परब, अर्चना घारे-परब, एम. के. गावडे, प्रज्ञा परब, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, उमेश येरम, प्रभाकर सावंत, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, प्रथमेश तेली आदी मान्यवरांनी जैतीर उत्सवाला भेट देत देवाचे दर्शन घेतले.

चौकट
चोख बंदोबस्त
या उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थान कमिटी, तसेच गावकर मंडळी व ग्रामस्थ यांच्यामार्फत योग्य नियोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com