मुसळधार पावसाने देवगडला झोडपले

मुसळधार पावसाने देवगडला झोडपले

88524

मुसळधार पावसाने देवगडला झोडपले
विजपुरवठा खंडितः टिळकनगरमध्ये घरावर कोसळली वीज
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ः तालुक्याच्या किनारी भागात गडगडाटासह आज सकाळी झालेल्या पहिल्याच पावसाने चांगलाच दणका दिला. जामसंडे टिळकनगरमध्ये घरावर वीज पडून आतील विजेच्या उपकरणांची मोठी हानी झाली. जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. यातून नागरिकांच्या घरासभोवती पाणी साचण्याचा प्रकार घडला. पावसामुळे देवगड जामसंडे शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना पावसाने आज काहीसा दिलासा दिला. मात्र, मान्सुनपूर्व पहिलाच पाऊस नुकसानीचा ठरला. आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गडगटासह पावसाला जोरदार सुरूवात झाली. सुमारे दोन तास जोराचा पाऊस झाला. याचदरम्यान जामसंडे टिळकनगर भागात एका घरावर वीज पडून घरातील विद्युत उपकरणे, विद्युत फिटींग तसेच अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले. घराच्या इमारतीला तडे जावून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने घरातील मंडळीना कोणतीही इजा झाली नाही. वीज पडल्याची माहिती मिळताच नगरसेविका तन्वी चांदोस्कर, देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासन, महावितरण कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. यावेळी स्थानिकांनीही गर्दी केली होती. यंत्रणेकडून नुकसानीची नोंद करण्यात येत होती. याचबरोबर शहरातील विविध भागातील नागरिकांच्या वीजेच्या उपकरणांची हानी झाली. तसेच किनारी भागात झालेल्या दमदार पावसाने शहरातील गटारे भरून पाणी वाहत होते. काही भागात रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. काही भागात गटारांच्या समस्यांमुळे नागरिकांच्या घराभोवती पाण्याचे तळे झाले होते. पहिल्याच पावसात शहरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. विविध भागात गटारामध्ये पाणी साचून नागरिकांना समस्या जाणवल्या. जोराच्या पावसामुळे पाण्याचा योग्य निचरा होण्याअभावी घरे, इमारतीभोवती पाणी साचून राहिले होते. देवगड जामसंडे नगरपंचायतीचे अभियंता विवेक खोत यांच्यासह कर्मचार्‍यांनी शहरातील विविध ठिकाणच्या पाणी समस्येची पहाणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com