पावस पंचक्रोशीतील १३० गुरख्यांची माहिती पोलिसांकडे

पावस पंचक्रोशीतील १३० गुरख्यांची माहिती पोलिसांकडे

पावस पंचक्रोशीत १३० गुरखे
पुढील वर्षी ग्रामपंचायतींवर जबाबदारी ः पोलिस पाटलांमार्फत देणार सूचना
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः मे महिन्यात गोळप परिसरामध्ये नेपाळी राखणदारांचे दुहेरी हत्याकांड झाले होते. त्यामुळे परिसरातील आंबा बागायतदारांकडून त्यांच्याकडे असलेल्या गुरख्यांची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे आंबा बागायतदारांनी १३० गुरख्यांची माहिती पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील वर्षी अशा हिंसात्मक गोष्टींना आळा बसावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभेमध्ये गुरख्यांची माहिती पोलिसांना तातडीने देण्याबाबत आदेश दिले जाण्याची शक्यता असून त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
पावस परिसरामध्ये आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्थानिक मजूर परवडत नसल्याने नेपाळमधून गुरख्यांना कामासाठी आणले जाते. त्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे; मात्र त्या माध्यमातून परिसरामध्ये चोऱ्या, खून, मारामारी अशा गोष्टी होऊ लागल्या आहेत. अशा वेळी या गुरख्यांचे नाव, गाव, पत्ता याबाबत कुठेही नोंद नसल्यामुळे तपासांमध्ये अडथळे निर्माण होतात. या संदर्भात यापूर्वी बागायतदारांना सूचना दिलेल्या आहेत; परंतु आंबा बागायतदार या सूचनांचे पालन करत नाहीत. नुकत्याच गोळप येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर हा विषय ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात या परिसरामध्ये या गोष्टींना आळा बसावा यासाठी सर्व बागायतदारांना सूचना दिल्या होत्या. त्याला यावर्षी काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला; परंतु पुढील वर्षी परिसरातील सर्व गुरख्यांची माहिती पोलिस ठाण्यामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी पोलिसपाटलांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बागायतदारांना सूचना देण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव केला जाणार आहे. त्या माध्यमातून सर्वांची माहिती आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वी पोलिसांना देण्यात यावी अन्यथा बागायतदारांवर कारवाई करण्यात येईल, असा आदेश देण्याची शक्यता आहे तसेच मच्छीमारी बोटीवरही नेपाळी गुरखे आलेले असतात. त्यांची माहिती कोणालाही नसते. त्यासाठीही पूर्णगड पोलिसांतर्फे पावले उचलली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com