पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे जगवा

पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे जगवा

88818

पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे जगवा

सुधीर गोसावी ः मालवणात रोप वितरण उपक्रमास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : आज वाढत्या तापमानवाढीचा धोका लक्षात घेता झाडे लावणे आणि ती जगवणे महत्त्वाचे बनले आहे. पर्यावरण संतुलनात जंगली झाडे ही पडद्यामागची कलाकार असतात. याच जंगली झाडांची आज मोठी गरज आहे. पूर्वीच्या पिढीने जंगली झाडे जोपासून ठेवली; मात्र आजच्या पिढीला जंगली झाडांची माहिती व त्यांचे महत्त्व माहीत नाही, म्हणूनच पर्यावरण संतुलनासाठी जंगली झाडे जोपासली पाहिजेत, असे प्रतिपादन शिक्षक व वृक्षप्रेमी सुधीर गोसावी यांनी येथे केले.
येथील ‘यूथ बिट्स फॉर क्लायमेट अॅँड इकोमेट्स’ या ग्रुपतर्फे पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी रोप खरेदी व भेट उपक्रम येथील राजकोट किल्ला येथे झाला. ज्यांना झाडे लावायची आहेत त्यांनी आपल्याला हवी असलेली झाडे सांगावीत किंवा ज्यांना झाड लावणे शक्य नसेल, त्यांनी झाड खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करावे, अशी या उपक्रमाची संकल्पना होती. व्यासपीठावर वन विभागाचे परिमंडळ वन अधिकारी श्रीकृष्ण परीट, यूथ बिट्स फॉर क्लायमेट ग्रुपच्या अध्यक्षा मेगल डिसोझा, अनुभव शिक्षा केंद्रचे जिल्हा समन्वयक सहदेव पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी कविता तळेकर यांनी वृक्ष व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगणारी गीते सादर केली. उद्योजक भूषण साटम यांनी शिवरायांच्या प्रधान मंडळातील अमात्य व सिंधुदुर्गचे सबनीस रामचंद्र पंत यांनी लिहून ठेवलेले शिवरायांचे वृक्ष लागवडीबाबतच्या आज्ञापत्राचे वाचन केले. शिवरायांच्या चरित्रावर आधारित कविता सादर केली. यावेळी नोंदणी केलेल्या वृक्षप्रेमी नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची झाडे भेट देण्यात आली. स्वाती पारकर व मेगल डिसोझा यांच्या नियोजनाखाली आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी स्वाती पारकर, चारुशीला देऊलकर, मनीषा पारकर, अनिता पारकर, ओंकार केणी, आनंद हुले, परशुराम पाटकर, पत्रकार भूषण मेतर, दर्शन वेंगुर्लेकर, अक्षय रेवंडकर, भार्गव खराडे, नेहा कोळंबकर, वैशाली शंकरदास, गौरी कुमामेकर, मीना घुर्ये, पल्लवी खानोलकर, अंजना सामंत, ऐश्वर्य मांजरेकर, स्वप्नील गोसावी, तेजस कातवणकर, राहुल जाधव, निमिष बापर्डेकर, आदित्य बटावले, संजय परुळेकर, समीर वायंगणकर, दीक्षांत कुबल, ऋषिकेश सामंत, दत्तप्रसाद सामंत आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. संस्कृती बांदकर यांनी आभार मानले.
---
उपक्रमाची माहिती अन् कौतुक
प्रारंभी मेगल डिसोजा यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची रूपरेषा व त्यामागचा उद्देश स्पष्ट केला. यूथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स ग्रुप पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी वन अधिकारी श्री. परीट यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण रक्षण करणे हे कर्तव्य आहे, विविध प्रजातीची झाडे लावली पाहिजेत, लावलेली झाडे जगली पाहिजेत, याची काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी अशा संस्था प्रत्येक गावात निर्माण झाल्या पाहिजेत, असे सांगितले. सहदेव पाटकर यांनीही मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com