आंबापिकाखालचे क्षेत्र 3 तालुक्यात घटले

आंबापिकाखालचे क्षेत्र 3 तालुक्यात घटले

89007

आंबापिकाच्या क्षेत्रात तीन तालुक्यांत घट
वातावरणाच्या तडाख्याने पीकबदलाचा विचार; सहा तालुक्यांत मात्र वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः गेल्या दहा वर्षांत नऊ तालुक्यांपैकी रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर या ३ तालुक्यांतील आंबापिकाखालचे क्षेत्र घटले आहे, तरीही रत्नागिरी तालुक्यातील आंबापिकाखालील क्षेत्र अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. २०२२-२३ मधील नोंदीनुसार १६ हजार ४३ हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये आंबापिकाखालचे क्षेत्र वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यात १ हजार ५२३ हेक्टर, लांजा तालुक्यातील ५२ हेक्टर, तर संगमेश्वर तालुक्यातील २१ हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीपाठोपाठ आंबा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. फळांचा राजा अशी ओळख असलेला ‘हापूस’ रत्नागिरीची प्रमुख ओळख आहे. ‘पायरी’, ‘रायवळ’सह अन्य विविध जातीच्या आंब्याची लागवड केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आंबा बागायतदारीमुळे आमरस, आंबापोळी, कैरी पन्हे, आंबावडी, आंबालोणचे असे विविध फळप्रक्रिया उद्योगसुद्धा आहेत. रत्नागिरी, लांजा, संगमेश्वरातील आंबापिकाची जमीन कमी झाली असली, तरी मंडणगड तालुक्यात ४१ हेक्टरने, दापोलीत ५८ हेक्टर, खेड १०५ हेक्टर, चिपळूण १८ हेक्टर, गुहागर ७५ हेक्टर आणि राजापुरात ३८८ हेक्टर क्षेत्रात वाढ झाली आहे. १० वर्षांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील आंबापिकाखालचे क्षेत्र १७ हजार ५६६ हेक्टर होते, ते आता १६ हजार ४३ हेक्टरपर्यंत राहिले आहे. लांजा तालुक्यातील ५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्र आंबापिकाखाली होते. ते आता ५ हजार ९४४ हेक्टरवर आले आहे. संगमेश्वरात ६ हजार ४५४ हेक्टर क्षेत्र आंबापिकाखाली होते. ते ६ हजार ४३१ हेक्टरवर आले आहे. मंडणगड तालुक्यात १० वर्षांपूर्वी ५ हजार ७८९ हेक्टर क्षेत्र आंबापिकाखाली होते. ते वाढून ५ हजार ८३० हेक्टर क्षेत्र इतके वाढले आहे. दापोलीतील ६ हजार ४६७ हेक्टर क्षेत्र ६ हजार ५२५ हेक्टवर पोहोचले आहे. खेडमधील ५ हजार ८९१ हेक्टर क्षेत्र आंबापिकाखाली होते. ते आता ५ हजार ९९६ हेक्टरपर्यंत वाढले आहे. चिपळुणात ६ हजार २४५ हेक्टर क्षेत्र वाढून ६ हजार २६३ हेक्टर क्षेत्र झाले आहे. गुहागरातील ४ हजार ९८९ हेक्टर क्षेत्र वाढून ५ हजार ६४ हेक्टरपर्यंत गेले आहे. राजापूर तालुक्यातील आंबापिकाखालचे क्षेत्र आता ८ हजार ७४२ हेक्टर झाले आहे.

चौकट
शेतकऱ्यांचा कल काजू लागवडीकडे
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात जी लागवड झाली, त्यामध्ये काजूला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले गेले होते. आंबापिकाला वातावरणाचा तडाखा बसत असून, हा व्यवसाय आतबट्ट्याचा होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागा कराराने देण्यास सुरवात केली आहे. तसेच नव्या लागवडीत ‘हापूस’पेक्षा अन्य पिकांचा विचार होऊ लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com