संगमेश्वर - पावसाची वर्दी देणारा मृग होतोय दुर्मिळ

संगमेश्वर - पावसाची वर्दी देणारा मृग होतोय दुर्मिळ

पावसाची चाहूल देणारा
‘मृग’ होतोय दुर्मिळ !

आढळ झाला कमी ; बदलत्या वातावरणाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः ज्या नक्षत्रापासून पावसाचा प्रारंभ होतो त्या नक्षत्राला मृग नक्षत्र म्हणतात. निसर्गाच्या विलोभनीय आणि रमणीय आविष्काराचे दर्शन हे नक्षत्र घडवते. त्यामुळे ते सर्वांनाच हवेहवेसे वाटते. या नक्षत्राची चाहूल लागते ती एका छोट्याशा मृगकिड्यामुळे. ग्रामीण भागात याला मिरग म्हणतात. पूर्वीपेक्षा सध्या मृगकिड्यांचे दर्शन होणे दुर्मिळ आहे.
तांबूस रंगाचा मखमलीसारखा दिसणारा हा छोटा कीटक सर्वसाधारणपणे रोहिणी नक्षत्रापासून दिसू लागतो. मृगाचा कीडा हा निरूपद्रवी म्हणून ओळखला जातो. मृग हातावर घेतल्यानंतर तो कासवाप्रमाणे आपले शरीर आक्रसून घेतो. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे तो अधिकच उठावदार दिसतो. त्याच्या दर्शनाने पावसाच्या आगमनाची चाहूल लागते आणि हे ठोकताळे तंतोतंत खरे ठरतात. गेली कित्येक वर्षे कोकणातील शेतकरी मृगकिड्याच्या दर्शनावर शेतीचे ठोकताळे बांधत आले आहेत. हा मृगकीडा जन्माला कसा येतो आणि मृत्यूनंतर पुन्हा पुढील वर्षी त्याची उत्पत्ती कशी होते हे अद्याप न सुटलेले कोडे आहे. लहान मुलांना आकर्षित करणारा हा मृगकीडा शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची चाहूल देण्यासाठी जन्म घेतो आणि आपले संदेशवहनाचे काम झाले की, लुप्तही होतो. त्याचे आयुष्य हे फक्त रोहिणी नक्षत्र ते मृग नक्षत्राएवढे अल्प आहे. निसर्गाच्या कालचक्रात शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक संकेतांमध्ये हा छोटासा जीव आपली मोठी भूमिका पार पाडून पुढील जन्मासाठी चिरनिद्रा घेतो. बदलत्या वातावरणात मात्र मृगकिड्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com