बळीराजाचे आगमन; शेतीकामांना वेग

बळीराजाचे आगमन; शेतीकामांना वेग

89003

वरुणराजाचे आगमन; शेतीकामांना वेग

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड ः भात, नाचणीसह वरीची पेरणी

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ९ ः मिरगाला हुलकावणी दिल्यानंतर कालपासून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला असून तळेरे परिसरात आता शेतीकामांना वेग आला आहे. भात, नाचणी, वरीच्या बियाणांची पेरणी करतानाच अन्यही हंगामी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. भरडी जमीन नांगरणी आणि जलद कामकाजासाठी आता बैलजोडीचा वापर कमी झाला असून, मिनी पॉवर
िटिलरला पसंती मिळू लागली आहे.
गेले काही दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने मागील दोन दिवसांपासून बऱ्यापैकी हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण केला. शेतीकामासाठी आवश्यक असणारा पाऊस जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. पावसाच्या अंदाजाने बहुतेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी अनेकांनी वातावरणाची परिस्थिती बघून सावध भूमिका घेतली आहे. पावसाचा जोर अद्याप कायम नसल्यामुळे वातावरणात उष्णता निर्माण झाल्यास त्याची झळ तरव्याला (रोपाला) बसू नये, यासाठी अनेकांनी बियाणांची पेरणी करण्यासाठी विलंब केल्याचे दिसून येते.
भातशेतीमध्येही वाणांची स्पर्धा सुरू आहे. जुनी वालय, बेळा, मसुरा, कर्जत, पाटणी, सोनफळा, रत्नागिरी अशा प्रकारचे वाण कालबाह्य ठरले असून त्यांची जागा घेतलेले रुपाली, वाडा कोलम, कावेरी, सोनम, सोनम अंकुर, शुभांगी, मसुरी, कोमल, जया, ६४४४ हे वाण कमी कालावधीत जादा उत्पादन देणारे असल्याने ते शेतकरी वापरताना दिसत आहेत. त्यासाठी कृषी केंद्रांवर, खरेदी-विक्री संघात ग्राहकांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मिनी पॉवर टिलर यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बैलजोडीबरोबरच गोधन सांभाळण्याचा त्रास नको म्हणत जनावरे विकली. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मिळणारे शेणखत दुर्मिळ झाले. तेव्हा शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला असल्याचे दिसून येत आहे.
------------
चौकट
बाजारपेठेत गर्दी कमी
आता शेतीच्या कामांना सुरवात होत असून यापुढे शेतकरी व्यस्त राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाशी जोडलेल्या बाजारपेठेत आठवडा बाजारात गर्दी कमी दिसून येणार आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध सणांच्या निमित्ताने बाजारपेठ पुन्हा बहरेल, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com