पश्चिम महाराष्ट्राच्या नेतेपदी भास्कर जाधव

पश्चिम महाराष्ट्राच्या नेतेपदी भास्कर जाधव

पश्चिम महाराष्ट्राच्या नेतेपदी भास्कर जाधव

ठाकरे सेनेची घोषणा ; विदर्भातील चांगल्या कामगिरीचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : पूर्व विदर्भात महाविकास आघाडीला यश मिळवून देणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावर आता पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेतेपदी जाधव यांची निवड झाल्याचे मातोश्री वरून जाहीर करण्यात आले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट करून भाजपसोबत गेले. त्यानंतर ठाकरे गटाची शिवसेना राज्यात रसातळाला गेली होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी विधानसभेत आणि राज्यात ठाकरे गटाची बाजू एकतर्फी सांभाळली. मागील विधानसभा निवडणुकीत झालेली महाविकास आघाडी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही कायम होती. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी शिवसेनेने आमदार जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी दिली होती. येथील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, रामटेक या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार देण्यात आले होते. परंतु शिवसेनेच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून आमदार भास्कर जाधव यांच्याकडे जबाबदारी होती. आमदार जाधव यांनी पूर्व विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात सभा घेऊन महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्मिती केली. प्रामुख्याने त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या चारही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार जाधव यांना पश्चिम महाराष्ट्राच्या नेतेपदाची जबाबदारी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागाच्या नेतेपदी आमदार जाधव यांची मातोश्रीवरून शनिवारी नियुक्तीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर कोकणातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके वाजवण्यात आले.

.............
कोट

आमदार भास्कर जाधव यांनी प्रचार केलेल्या चारही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रात ही आगामी काळात भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाची शिवसेना आणि महाविकास आघाडी यश प्राप्त करेल. भास्कर जाधव लोकसभा निवडणुकीत किंगमेकर ठरले आणि आगामी काळातही किंगमेकर ची भूमिका बजावतील.

- जितेंद्र चव्हाण, तालुकाप्रमुख ठाकरे शिवसेना चिपळूण - गुहागर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com