उभळे गावातील चिरेखाणीत रसायन भरलेल्या गोणी

उभळे गावातील चिरेखाणीत रसायन भरलेल्या गोणी

89336
89337
--------

उभळेतील चिरेखाणीत रसायन भरलेल्या गोणी
मातीचा भराव टाकून बुजविण्याचा प्रयत्न; महसूलकडून शोध सुरू
चिपळूण, ता. ११ : तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत एका मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायनमिश्रित घातक पदार्थांनी भरलेल्या गोणी सोमवारी आढळून आल्या. या गोणीमध्ये निळ्या रंगाचा घातक पदार्थ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून, या गोणींवर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. या रसायनमिश्रित गोणी कोणी आणल्या, त्याचा शोध महसूलकडून सुरू झाला आहे. हे रसायन लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांचे असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे; मात्र ते कोणत्या कंपनीचे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिरेखाण मालकाच्या चौकशीतून हे स्पष्ट होणार आहे. या प्रकारामुळे ऐन पावसाळ्यात वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या बाबतीत धोकादायक स्थिती निर्माण झाली असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कळमुंडी-तनाळीजवळच्या व उभळे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात उघड्या चिरेखाणी आहेत. यातील एका चिरेखाणीत सुमारे ७०० घातक पदार्थाने भरलेल्या गोणी टाकलेल्या दिसून येत आहेत. निळ्या रंगाचा हा पदार्थ असून, त्यावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. गेले दोन दिवस पाऊस पडल्याने या गोणींवरचा मातीचा भराव बाजूला झालेला आहे. पावसाळ्यात या उघड्या चिरेखाणी तु़डुंब भरतात. रानावनात चरण्यासाठी गेलेली गायी-गुरे पाण्याने भरलेल्या या खाणीत पाणी पिण्यासाठी जातात तसेच येथूनच एक नदी वाहते. या नदीला चिरेखाणींमधील पाणी वाहत जाते. ही नदी गुढे गावाला जाऊन मिळते. नदीनाल्यांमध्ये चिरेखाणींमधील पाणी गेल्यास हा घातक पदार्थ मिसळून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोट
महसूल प्रशासनाने येथे पाहणी करून या पदार्थाचे नमुने घेऊन संबंधित प्रयोगशाळेत पाठवावे जेणेकरुन हा घातक पदार्थ नेमका कोणता आहे, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, या पदार्थामुळे पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित चिरेखाण मालक कोण, या गोणी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणी आणून टाकल्या0 याचा शोध घ्यावा व कारवाई करावी.
- जितेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट
------------
कोट
या खाणीची आम्ही पाहणी केली असून, रसायन भरलेल्या गोणी आढळून आल्या आहेत. आम्ही तहसीलदारांना कळवले आहे. चिरेखाण मालकाची चौकशी सुरू आहे.
- मधुरा कदम, मंडल अधिकारी, मार्गताम्हाणे
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com