रत्नागिरी ः काळबादेवी नवीन पुलासाठी २९१.६४ कोटी खर्च

रत्नागिरी ः काळबादेवी नवीन पुलासाठी २९१.६४ कोटी खर्च

89357
89360

काळबादेवी पुलास २९२ कोटी खर्च अपेक्षित
सागरी महामार्ग; पाच पिलर उभारणार, पर्यटनाला मिळणार चालना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर असलेल्या कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांचे काम विजय एम. मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनीस मिळाले आहे. रत्नागिरी काळबादेवी सागरी पुलासाठी २९१.६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस-रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. या सागरी महामार्गासाठी नऊ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. हा सागरी महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. या महामार्गावरील खाड्या आणि नद्या ओलांडण्यासाठी किमान ८ नवीन पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च २०२४ मध्ये तीन वर्षांच्या बांधकाम मुदतीसह टेंडर मागवली होती. कमर्शियल टेंडरमध्ये सर्वात कमी बोलीदार म्हणून विजय एम. मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही खाडीपुलांच्या कामाचा नारळ फोडण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
या सागरी महामार्गावर कुणकेश्वर येथे एक पूल बांधण्यात येणार आहे. १.६ किमी लांबीचा हा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येईल. त्यामध्ये १६५ मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनसह ३३० मीटर लांबीच्या आयकॉनिक पुलाचा समावेश आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यात २ लेन असलेला १.८ किमी लांबीचा काळबादेवी पूल येथील खाडीवरील काळबादेवी बीच आणि सडामिऱ्याला जोडेल. काळबादेवी येथे पूल उभारण्यासाठी आवश्यक चाचपणी गतवर्षी केली आहे. या ठिकाणी पाच पिलर उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनाऱ्यालगतच्या अरूंद गावठाणातून हा मार्ग जाणार आहे. रेवसला सागरी मार्गाची सुरवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेवस-रेड्डी सागरी रस्त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. आराखड्याला १६ मे २०२२ ला मंजुरी देण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नव्याने तयार केलेल्या ४९८ किलोमीटर लांबीच्या आराखड्यात काही रस्त्यांचे चौपदरीकरण केले जाणार आहे तर उर्वरित मार्ग दुपदरी आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रूंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे. ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत. एमएसआरडीसीने रेवस ते रेड्डी या ४४७ किमीच्या सागरी किनारा मार्गावर आठ खाडीपूल बांधण्याचे नियोजन केले आहे.

कोट
गुजरातच्या लकपत ते कन्याकुमारीपर्यंत सागरी महामार्ग तयार आहे; परंतु महाराष्ट्रात प्रलंबित आहे. काळबादेवी आणि कुणकेश्वरची निविदा प्रक्रिया प्रत्यक्षात आल्यामुळे या मार्गाचे काम सुरू होईल, अशी आशा आहे; मात्र दाभोळ, बाणकोट आणि जयगड या पुलांची निविदा प्रक्रियाही पूर्ण होणे गरजेचे आहे तसेच पुलानंतर चिंचोळ्या पट्टीतील भागात जमीन संपादन करून तिथे रस्ता रूंदीकरण झाले पाहिजे जेणेकरून कोकणातील पर्यटन, व्यापारउदीम आणि लष्करी सिद्धता याला पूरक मार्ग तयार होईल.
- अॅड. विलास पाटणे, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com