

उद्योग साकारताना ......लोगो
94220
इंट्रो
उद्योग सुरू करतानाच किंवा उद्योग सुरू करण्याच्या आधी काही महिने उद्योजकाने ज्या गोष्टींचे उत्पादन घ्यायचे आहे त्या संदर्भात लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची, उपकरणांची माहिती नीटपणे मिळवणे, त्यांच्या नोंदी ठेवणे व उद्योगाशी साधर्म्य असणाऱ्या उद्योजकांकडून संदर्भित मशिनरी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन माहिती मिळवून घेणे अपेक्षित असते. नियोजनबद्ध माहिती मिळवली तर उद्योजकाचे त्याच्या उद्योग व्यवसायातील त्याला आवश्यक असणाऱ्या उत्पादनांसाठी कोणती यंत्रसामुग्री विकत घ्यायची या विषयीचे मत निश्चित होऊन निर्णयप्रक्रिया तत्काळ सुरू करायला साहाय्यभूत ठरू शकते.
- प्रसाद जोग
------
यंत्र उत्तम तर उत्पादने सर्वोत्तम
उद्योजकाने उद्योगधंद्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीविषयी माहिती मिळवण्यासाठी काय करायला हवे ?
उत्तर : यंत्र उत्तम असल्यास उत्पादने सर्वोत्तम हाच खरा उद्योजकीय मंत्र उद्योजकांनी समजून घेणे आवश्यक आहे. ग्राहक, बाजारपेठ, कच्चा माल उपलब्धता व मानव संसाधनांप्रमाणेच बाजारपेठ पाहणी किंवा सर्वेक्षण करताना उद्योजकांनी स्वयंप्रेरणेने माहिती संकलित करून निर्णय घेतला पाहिजे. कारण कोणत्याही उद्योजकांसाठी यंत्रखरेदी हा मोठा जोखमीचा व खर्चिक टप्पा असू शकतो. यंत्रे ही उद्योजकांसाठी मौल्यवान संपत्ती असतात. जर गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास उद्योजकाने नवीन मशिनरी खरेदी करणे जास्त संयुक्तिक ठरू शकते. उद्योजक आंतरजालावरून अद्ययावत माहिती घेऊन यंत्रसामुग्री आयातही करू शकतात. जर उद्योग छोटा असेल तर उद्योजकाने स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या मशिनरी उत्पादकांच्या सल्ल्याने आस्थापनेमध्ये आवश्यक असणारे यंत्र स्वतःचे स्वतः विकसित करायचा निर्णय घेतला तरीही तो किफायतशीर ठरू शकतो. योग्य यंत्रांचा वापर करून उद्योजक उत्तम दर्जाची उत्पादने तयार करू शकतो; पण उत्पादन खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी उद्योजकाला एकदा बसवलेल्या यंत्रसामग्रीत सारखे सारखे बदल करता येत नाहीत. नवीन उद्योग सुरू करतानासुद्धा उद्योजकाला उत्पादनाची गुणवत्ता सातत्याने टिकून राहील, अशीच यंत्रणा उभारावी लागते. त्यामुळे उद्योजक यंत्रसामुग्री बसवताना तिचा देखभाल खर्च कमी येईल का? किंवा लागणारे इंधन तुलनेने कमी दराचे असेल का? असाच विचार करतात. नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांनी बाजारपेठ पाहणी दरम्यान आपल्यासारखाच उद्योग करणाऱ्या उद्योजकांच्या आस्थापनेला भेट देऊन प्रश्नावली स्वरूपात त्या उद्योजकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे...
सदर प्रश्नावली
१. एखादे विशिष्ट उत्पादन घेण्यासाठी कोणती विशिष्ट यंत्रसामुग्री वापरता ?
२. उपलब्ध यंत्रसामुग्री ही भारतीय बनावटीची आहे का आयात केलेली?
३. स्थानिक बाजारपेठेत या मशिनरीचे विक्रेते कोण आहेत ?
४. मशिनरीची किंमत काय असू शकेल?
५. मशिनरी किती अश्वशक्तीची आहे? किंवा यंत्रसामुग्रीची क्षमता काय आहे?
६. मशिनरीसाठी सिंगल फेज वीज लागते का थ्री फेज?
७. मशिनरी चालवण्यासाठी कुशल कामगार लागतात का अर्धकुशल ?
८. वापरत असलेली मशिनरी बंद पडली तर काय करता? काही पर्यायी व्यवस्था आहे का?
९. मशिनरीला बिघाड झाल्यास त्याचे स्वरूप काय व त्याची कारणे काय काय असू शकतात?
१०. मशिनरी उत्पादकाकडून मशिनरीला काही गॅरंटी किंवा वॉरंटी मिळते का?
११. मशिनरी मासिक हप्त्यांवर विकत घेता येते का? किंवा सदर यंत्रसामुग्री विकत घेण्यासाठी कर्ज प्रकरण होऊ शकते का?
१२. मशिनरी कारखान्यामध्ये व्यवस्थित बसवून ती कार्यान्वित करून देणारे कोणी सल्लागार किंवा तंत्रज्ञ आपल्या ओळखीत आहेत का?
-------
यंत्रसामुग्री स्थानिक पातळीवर अभियंत्यांना सांगून विकसित करून घेता येऊ शकते का ?
उत्तर : अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी बाजारात स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित यंत्रसामुग्रीचे वितरक उपलब्ध असतात. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही; पण जर जुन्या चालू असणाऱ्या चांगल्या दर्जेदार मशिनरी स्थानिक बाजारपेठेतून उद्योजकाला विकत घ्यायच्या असतील व स्वत:च्या उत्पादन क्षमतेनुसार किंवा आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्रीत बदल घडवून आणायचे असेल तर स्थानिक पातळीवर उच्चशिक्षित; पण अभियांत्रिकीची व्यावहारिक आवड असणाऱ्या तांत्रिकाकडून कमी भांडवलात जास्त क्षमतेच्या मशिनरी विकसित करून घेता येऊ शकतात.
वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगांसाठी लागणारी मशिनरी साधारणपणे काय काय असू शकते ?
उत्तर : धुणे, निवडणे, चाळणे, साफ करणे, आच्छादित करणे, एकसंघ करणे, ढवळणे, घुसळणे, गर काढणे, कापणे, तुकडे करणे, चूर्ण करणे, सुकवणे, खारवणे, बाटलीबंद करणे, निर्वातीकरणं करणे, उकळणे, वाफ येऊ देणे, वाफवणे, छिद्र पाडणे, प्रतवारी करणे, घर्षण करणे, मळणे, लाटणे, साल काढणे, मोड आणणे, शीतकरण करणे, दुधाचे पाश्चरायझिंग करणे, आंबवणे, सडणे, गरम करणे, थंड करणे, वहन करणे, स्थिरीकरण करणे, वजन करणे, तंतू काढणे, कठिणपणा आणणे, मृदू करणे या व अशा प्रकारच्या विविध प्रक्रियांसाठी उद्योजकाला छोटी-मोठी उपकरणे यंत्रसामुग्री आणि मशिनरी यांची गरज असते.
अन्नप्रक्रिया उद्योजकांना लागू शकणाऱ्या यंत्रसामुग्रीची यादी अशीः
मिक्सर, ब्लेंडर, रेफ्रिजरेटर, स्टरर, हिटर, बॉयलर, क्रशर, ग्राइंडर, पल्वरायझर, टॅंक, स्पिनर, स्प्राउटर, कनव्हेअर, एलेव्हेटर, ड्रम, मिल, स्लायसर, चिलिंग प्लांट, ओव्हन, डीहायड्रेटर, ह्युमिडीफायर, डीह्युमिडीफायर, वेईंगमशिन, पॅकेजिंग मशिन, स्टीमर, डीप फ्रिज, प्रेस, ड्रीलिंग मशिन इत्यादी.
----
यंत्र विकत घेताना घ्यावयाची काळजी
१. यंत्रसामुग्री खरेदी करताना उद्योगाची गरज व उत्पादनासाठी आवश्यक असणारीच यंत्रसामुग्री विकत घेण्याकडे कल असावा.
२. विविध सक्षम पर्यायांचा नीट विचार करून यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी सुयोग्य नियोजन करून पुढील कार्यवाही करावी.
३. शक्यतो वापरलेल्या, जुन्या, प्रमाणित नसलेल्या मशिनरी स्वस्तात मिळतात म्हणून आस्थापनेत बसवून घेऊ नयेत.
४. घाईगडबडीत किंवा जाणकारांचा सल्ला न घेता उतावीळपणे कोणत्यातरी प्रलोभनांना किंवा भूलथापांना बळी पडून यंत्रसामुग्री खरेदी करू नये.
५. मशिनरी घेत असताना कामगार न मिळाल्यास ती उद्योजकाला स्वतःला चालवता आली पाहिजे, या हेतूने घेतलेली असावी.
६. उद्योगाच्या सुरवातीलाच मशिनरी घरी घेऊन येण्याआधी त्या मशिनरीचे प्रात्यक्षिक पाहून घ्यावे. मशिनरी अवजड असल्यास त्याचा डेमो व्हिडिओ घ्यावा.
७. मशिनरी मशिनरी उत्पादकांच्या योग्य (माणसांकडून) वितरकांकडून खरेदी करून आस्थापनेत त्यांच्या मार्गदर्शनाने बसवून घ्यावी.
८. यंत्रसामुग्रीचा आवश्यक तो विमा काढून घेऊन मगच मशिन वापरण्यास सुरवात करावी.
९. मशिन विकत घेण्याच्या आधी व विकत घेतल्यानंतरही मशिनबरोबर येणारे संदर्भित पुस्तक जरूर वाचावे व संग्रही ठेवावे.
१०. गुणवत्ता मानांकन असलेल्या व योग्य कॅलिब्रेशन झालेल्या यंत्रसामुग्रीलाच आणि उपकरणांना पसंती द्यावी.
------
उत्पादन निर्मितीप्रक्रिया व मशिनरीची तांत्रिक बाजू उद्योजकांनी समजून घेणे गरजेचे आहे का ?
उत्तर : उत्पादन निर्मितीप्रक्रिया समजून घेऊन उद्योजकाने आस्थापनेत कच्चा माल आणण्यापासून ते उत्पादन बाजारात उतरवेपर्यंत कोणकोणती यंत्रसामुग्री लागू शकते याची सूची करणे आवश्यक आहे व त्यानुसार छोट्या छोट्या विभागात प्रक्रियेच्या प्रकारानुसार मशिनरीनची विभागणी करणे व आस्थापनेतील उत्पादनानुसार त्याचे प्रक्रिया चक्र बनवून ते आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्या कारागिरांना समजावून सांगणे गरजेचे आहे तसेच सातत्यपूर्ण उत्पादन मिळण्यासाठी आस्थापनेतील मशिनरीचे ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. नियमित व प्रासंगिक देखभालीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ नेमणेही गरजेचे आहे. यंत्रसामुग्री हा कोणत्याही उद्योगाचा प्राण आहे. त्यामुळे आस्थापनेत असणाऱ्या यंत्रसामग्रीवर विनाअपघात, पूर्णक्षमतेने काम होण्यासाठी मशिनरींची बाह्य व आंतरिक भागातील माहिती करून घेणे क्रमप्राप्त आहे. उद्योजक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला असेल तर त्याला उद्योगातील यंत्रसामुग्री नक्की कशी कार्यान्वित होतात याची तांत्रिक माहिती लगेचच कळू शकते; पण जर उद्योजक अभियांत्रिकी प्रशिक्षण घेतलेला नसेल तर त्या उद्योजकाने मशिनरी उत्पादकांकडून किंवा यंत्रसामुग्री पुरवठादारांकडून त्या मशिनसंदर्भात तांत्रिक प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे असते.
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.