केसरकरांना शिक्षण खाते समजलेच नाही

केसरकरांना शिक्षण खाते समजलेच नाही

Published on

केसरकरांना शिक्षण खाते समजलेच नाही

राजन तेली ः वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः दीपक केसरकर यांना स्वतःचे शालेय शिक्षण हे खाते समजले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. राज्याच्या निकषाचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक दर्जावर होत असून शिक्षण खात्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. याबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळ तक्रार करणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे सांगितले.
जिल्ह्यातील माध्यमिक संस्था आणि प्राथमिक शांळामधील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता त्यांच्या हितासाठी वेळप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशाराही श्री. तेली यांनी दिला.
श्री. तेली यांनी आज येथील भाजपच्या विधानसभा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ नाडकर्णी, कळणे सरपंच अजित देसाई आदी उपस्थित होते. श्री. तेली म्हणाले, ‘‘जिल्ह्यात २०० हायस्कूल आहेत; परंतु पटसंख्येचा विचार करता ती कशी टिकणार? हा प्रश्न आहे. प्राथमिक शाळांचा विचार करता ८० शाळांना पटसंख्येमुळे मुख्याध्यापक पद मिळणार नाही तर २५० मुलांपेक्षा कमी मुले असल्यास शारिरीक शिक्षणचा (पीटी) शिक्षक मिळणार नाही तर पाचशेपेक्षा कमी मुले असल्यास चित्रकलेचा शिक्षक मिळणार नाही. एकूणच हे निकष राज्यस्तरावरील असले तरी येथील एकूणच स्थिती पाहता याचा सर्वाधिक फटका येथील मुलांना बसत आहे. मुळात २००८ पासून पट पडताळणी झाल्यानंतर शिक्षकांची रिक्त पदे पुढे आली. त्यानंतर २०१२ मध्ये काही प्रमाणात ती भरली; परंतु आजची स्थिती ही माध्यमिक आणि प्राथमिक शाळांच्या बाबतीत दयनीय असून शासनाचा निकषाचा विचार करता मुलांच्या शैक्षणिक, बौद्धिक विकासावर याचा थेट परिणाम होत आहे. शालेय शिक्षण मंत्री हे या जिल्ह्याचे असल्याने त्यांनी या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे होते; परंतु येथील विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्याकडून काहीच होताना दिसून येत नाही. आज जिल्ह्यातील शाळांची ही परिस्थिती लक्षात घेता गोव्या राज्याच्या सीमेवरील मुले गोव्यातील शाळांमध्ये शिक्षणासाठी भरती होत आहेत. डीएड, बीएड बेरोजगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री या नात्याने खास बाब म्हणून काही निकष बदलणे गरजेचे होते; परंतु मंत्री केसरकर यांना शिक्षण खाते समजलेच नसल्याने मोठी कोंडी झाली आहे.’’
श्री. तेली पुढे म्हणाले, ‘‘राज्यात आज शिक्षण खात्यामध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणीच दखल घेत नाही. इंग्लिश मीडियम शाळांच्या स्पर्धांमध्ये मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. या ठिकाणी स्वतः पंधरा वर्षे आमदार असूनही कुठल्याही प्रकारचा उद्योग मंत्री केसरकर आणू शकले नाहीत. आश्वासनांचे गाजर दाखवायचे हा एक कलमी कारभार त्यांनी हाती घेतला आहे. गेल्या २५ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी जागा दिलेली असताना आज त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल उभारणार, अशी गर्जना ते करत आहेत. विकासाला आमचा विरोध नसून आम्ही अशा प्रकल्पाचे स्वागत करतो; परंतु शिक्षणाच्या बाबतीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर तसेच शिक्षकांवर सुरू असलेल्या अन्यायाला न्याय देण्याचे काम केसरकर करणार का? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे वेळ पडल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंत्री केसरकर यांच्या विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्यास मागे पुढे पाहणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडेही या संदर्भात तक्रार करणार आहे.’’
------------
चौकट
केसरकरांविरोधात रान उठवणार
मला दोनवेळा जनतेने पराभूत केले असले तरी जो पक्ष कणकवलीच्या पुढे आला नव्हता त्या भाजपला बांद्यापर्यंत मजबूत करण्याचे काम मी केले आहे; मात्र गेली १५ वर्ष आमदार असूनही स्वतः विकासात्मक बाबतीत काहीच न करू शकणारे केसरकर सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांनी घोषणा केलेले एक तरी काम मार्गी लागले का? हे जनतेने दाखवून द्यावे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी केसरकरांविरोधात रान उठवून त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या भूमिका, बदललेल्या भूमिका, दिलेली आश्वासने याबाबतही गावागावात जाऊन पत्रकार परिषदा घेऊन जनतेसमोर मांडणार आहे, असेही श्री. तेली म्हणाले.
94284

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.